स्वाध्यायाचे तंत्र - स्वाध्याय हा लोकांना खुश करण्यासाठी नाही तर भगवंताला खुश करण्यासाठी आहे

  
स्वाध्यायाचे तंत्र
          स्वाध्यायात लोकांना खुश करण्याची नाहीतर प्रभुला संतुष्ट करण्याची भावना असते. स्वाध्यायात विद्वत्तेचे प्रदर्शन करण्याचा हेतू नसतो. याचा अर्थ असा नाही की स्वाध्यायात अविद्वान प्रवचन करतात. स्वाध्यायात तर उच्च कोटीचे विद्वान प्रवचन करत असतात. 
          सगळे वक्ते जे बोलतात ते प्रवचन होत नाही. 'प्रवचना' ची वेगळी भूमिका असते. प्रवचन म्हणजे विशिष्ट प्रकारचे विचार हृदयात स्फुरतात ते काळजीपूर्वक सांगायचे, ते ऐकून स्वतःचे विचार दृढ करायचे. स्वाध्यायाचे हेच वैशिष्ट्य आहे. त्यात स्वतःचे विचार दृढ करायचे असतात. स्वाध्यायात वक्ता आणि श्रोता यांचे तादात्म्य झालेले पाहिजे. त्यांच्यामध्ये एकात्मता असली पाहिजे. वक्त्याला असे वाटले पाहिजे की श्रोते आपलेच आहेत आणि श्रोत्यांना असे वाटले पाहिजे की वक्ता आपला आहे. परस्परांमध्ये आत्मीयतेचा भाव निर्माण होणे जरुरी आहे.
        जिथे वक्त्याचा मूखचंद्र पाहून स्रोत्यांच्या हृदयसागराला भरती येते आणि श्रोत्यांचा मुखचंद्र पाहून व वक्त्यांचे चित्त भरून येते त्याला स्वाध्याय म्हणायचा. स्वाध्यायात एकात्मतेबरोबरच अमुक पद्धतीचे, अमुक प्रकारचे जीवन घडवण्याचा प्रयत्न असतो. म्हणून कृत्यश्च पुनः पुनः करणं अभ्यास: - केलेले पुन्हा पुन्हा करणे, वाचलेले पुन्हा पुन्हा वाचणे, बोललेले पुन्हा पुन्हा बोलणे, ऐकलेले पुन्हा पुन्हा ऐकणे त्याचे नाव स्वाध्याय.
        स्वाध्यायात कोणाला शिकवायचे नसते आणि कोणी शिकायला आलेला नसतो. स्वाध्यायात ऐकायला बसलेले सारे देव देवेश आहेत असे समजून वक्ता बोलतो. हा त्याचा विवेक आहे.
        जिथे वक्ता श्रोताचें ऐक्य होते तिथे भगवान नाचतो, तिथे संवाद होतो. संवादात चर्चा पण होते पण ते दोघांच्याही जीवन विकासासाठी असते. विवादात जी चर्चा होते ती एकमेकांना हरवण्यासाठी होते. म्हणून स्वाध्याय हा संवाद आहे, विवाद नाही. स्वाध्यायात वाक्ता-श्रोत्याची एकता असते.
     स्वाध्यायात श्रोता आणि वक्ता यांची ह्रदये आत्मीयतेने भरलेली असतात आणि वक्त्याच्या हृदयातून जे बाहेर पडते तो अभ्यास असतो. आणि अभ्यासातून श्रोत्याचा जीवन विकास होतो. पण तेच इतरत्र ठसून ठासून सांगण्यात येते तरीही त्यातून जीवन विकास होत नाही. जीवनात गुण फुलत नाहीत. वक्ता कसा असावा हेही शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे:
     जे शांत आणि संयमी आहेत, ज्यांच्या कानाने शास्त्र श्रवण केलेले आहे, जे जितेंद्रिय आहेत, जे स्री आणि विषयापासून विरक्त आहेत आणि दुसऱ्याकडून काही घेण्यात ज्यांचा हात संकोचतो, ते ब्राह्मण तारण्यास समर्थ आहेत. 
 

Comments