गुरु - आध्यात्मिक जीवनातील गुरु
गुरु
माणसाची एक भ्रांत समज आहे की गुरु मोक्ष देतो. तसे तर भारतीय संस्कृतीत गुरुचे फार महत्त्व आहे, पण गुरूपाशी काही मोक्षाची गाठोडे नाही की चुटकीसरशी देऊन टाकेल. प्रथम त्या व्यक्तीने स्वतःच स्वतःचा दृष्टिकोन तयार करायचा असतो आणि मग गुरु मार्गदर्शन करतो.
संत तुकाराम म्हणतात, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणूनही द्यावे हाती. भगवंतापाशी मोक्षाचे गाठोडे नाही की ते तुम्हाला त्याने द्यावे. मोक्ष ही एक समज आहे. मोक्ष म्हणजे संसाराच्या बंधनातून सुटणे. आपण वासनाने बांधले गेलेलो आहोत, त्यातून आपल्याला सुटायचे आहे. गुरु त्याचा मार्ग दाखवतो. म्हणून गुरु संस्थेची आवश्यकता आहे.
गुरु जीवन समजावतो, कशाप्रकारे जीवन असावे ते समजावतो. गुरुचे दुसरे काम म्हणजे प्रभूबद्दलचे माधुर्य आणि भाव वाढवणे हे होय. या महापुरुषांच्या, गुरुंच्या शब्दात शक्ती असते आणि या शब्दशक्तीच्या प्रभावामुळे ते ईश्वरभक्ती, ईश्वरनिष्ठा, ईश्वरश्रद्धा इत्यादींचे वर्णन करतात. आणि गुरुवर श्रद्धा असली तर नैसर्गिकपणे माणसाचा ईश्वराबद्दलचा भाव जागृत होतो. माणसाची ईश्वराबद्दलची श्रद्धा, भक्ती, निष्ठा वाढते; गुरुला तादात्म्यपूर्वक आणि तदाकार होऊन ऐकल्याने शिष्यामध्ये ईश्वरश्रद्धा - निष्ठा वाढत जाते. म्हणून परमार्थासाठी गुरुचे आगळे महत्त्व आहे. परंतु गुरु काही भगवंताचे दर्शन घडवणारा ठेकेदार नाही.
गुरुचे तिसरे काम आश्वासन देण्याचे आहे. मी हलका आहे, शूद्र आहे, अशी भावना काढून टाकून उत्तिष्ठत जाग्रत म्हणत तुम्हाला उठ, उभा हो, असे सांगून गुरु जागृत करतो. 'मी तुझ्या पाठीमागे आहे' या गुरुने दिलेले आश्वासनाच्या परिणामामुळे शिष्याचा उत्साह अनेक पटीने वाढतो. माझ्या मागे एक शक्ती उभी आहे अशा आश्वासनाची माणसाला गरज असते. आणि गुरु ते आश्वासन देतो.
Comments
Post a Comment