श्रीमद आद्य शंकराचार्य यांचे दृष्टांत.
उध्दारेदात्मानम्
योगारूढाचे वर्णन ऐकल्यावर माणसाला वाटते की मीही गीतेत सांगितल्याप्रमाणे योगारूढ बनेन. पण माणसाला जशा पुष्कळ गोष्टी मेहनत केल्याशिवायच हव्या असतात, तशीच ही सिद्धी मिळवण्यासाठी मेहनत करण्याची त्याची तयारी नाही. कोणी एकाने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला आणि आपण काहीही मेहनत केल्याशिवाय तीचा उपयोग करतो आहोत; तसा कोणीतरी भगवंताचा शोध घ्यावा आणि नंतर आपल्याला भगवंत मिळावा, आपल्याला कोणीतरी भगवंत दाखवावा असे सहज इच्छा असते. काहींना तर असे वाटते की कोणीतरी दुसरा त्यांचा विकास करेल तेव्हा विकास होईल. आणि असा विनासायास विकास करून घेण्यासाठीही कित्येक जण उतावीळ झालेले असतात. त्यांना लवकरात लवकर वर जायचे असते, म्हणजे की विकास करायचा असतो.
आत्मशांती, आत्मस्वास्थ, आत्म समाधान माणसाने स्वतः प्राप्त करून घ्यायचे आहे, स्वतःच पुण्य कमवायचा आहे. कोणी आत्मतृप्तश्च मानव: - आत्म तृप्त माणूस आपल्याला मिळाला म्हणजे तो आपल्याला आत्मतृप्ती किंवा आत्मशांती देईल ही भ्रामक समजूत आहे.
श्रीमद आद्य शंकराचार्यांनी याची समज दिली आहे की त्याने केलेला ऋणातून कर्जातून मुलगा पित्याला ऋणमुक्त करू शकेल पण संसाराच्या बंधनातून सुटायचे असेल तर स्वत:च स्वतःला सोडवावे लागते. मुलगाही त्यातून पित्याला सोडवू शकत नाही. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी दुसराही एक दृष्टांत देऊन सांगितले आहे. मस्तकावर जर भार ठेवलेला असला आणि तो भार दुसऱ्या कोणी उचलला तर आपला बोजा तात्पुरता कमी होतो पण भुकेचे दुःख कोणी कमी करू शकत नाही. मुलाने खाल्ल्यावर पित्याचे पोट भरत नाही. पत्नी खाते तेव्हा पतीचे पोट भरत नाही. भुकेचे दुःख स्वतःच सहन करायचे आहे.
श्रीमद आद्य शंकराचार्य तिसरा एकदृष्टांत देऊन समजावले आहे. समजा एखाद्या करोडपतीची पत्नी आजारी पडली आणि तिच्यावर प्रेमामुळे त्याला असे वाटले की, 'मी करोडपती आणि माझ्या पत्नीला कडू औषध प्यावे लागते, त्या ऐवजी ते औषध पिण्यासाठी एखाद्या माणसाला ठेवले तर? माझ्या पत्नीकडून पूजा होऊ शकत नाही, तर पूजा करायला जसा एक ब्राह्मण ठेवलेलाच आहे, तसाच औषध घेण्यासाठी एखादा माणूस ठेवावा. तो औषध घेईल आणि पत्नी बरी होईल!' पण असे होत नाही ज्याला रोग झाला आहे त्यालाच औषध घ्यावे लागते. त्यालाच पथ्ये पाळावी लागतात.
आज मुलाला शनीची साडेसाती असेल तर आई शनिवार करते, किंवा पतिला मंगळ असेल तर पत्नी मंगळवार करते आणि पतीदेव मात्र बाजारात बटाटावडा खात सांगत फिरतो की माझे फोटो मंगळवार करते आहे! पण अशा शनिवार किंवा मंगळवारचा काही फायदा नाही. या सर्व गोष्टी प्रत्येकाने स्वतःच केल्या पाहिजेत. ज्याला भूक लागली असेल त्यानेच खाल्ले पाहिजे, असे वेदांताचे सांगणे आहे. म्हणून स्वतःचा विकास माणसाने स्वतःच करायचा असतो.
Comments
Post a Comment