सत्यभामा आणि नारद यांच्यात घडलेला संवाद
भगवंताला पवित्र करणारे लोक
पुराणात एक गोष्ट आहे. एकदा देवर्षी नारद सत्यभामाला भेटण्यासाठी आले. त्यांनी बघितले तर सत्यभामा कसल्याशा चिंतेत पडलेली असावी असे वाटले. ते सत्यभामाला म्हणाले, असा कृष्णासारखा पती लाभला आहे आणि अशा विचारात काय पडलेल्या आहात आपण? सत्यभामा म्हणाली, 'काय सांगू तुम्हाला? या जन्मी तरी कृष्णा सारखा पती मिळाला पण पुढच्या जन्मी जर कोणाकडे छगनरावाशी संसार करण्याचा प्रसंग आला तर? येत्या जन्मी पण हाच पती लाभावा यासाठी कोणता उपाय असला तर सांगाल का?' नारद म्हणाले, तुमचे म्हणणे खरे आहे. या जन्मी असा तेजस्वी पती लाभला असेल आणि पुढील जन्मी कुणा फुकटरावा सोबत संसार करण्याची पाळी आली तर कठीणच प्रसंग म्हणावा लागेल.
परंतु शास्त्रात याला एक उपाय दाखवला आहे बरे का! सत्यभामा उदगारली, असे ! तर लगेच सांगा.' नारद पुढे म्हणाले 'शास्त्रात असे लिहिले आहे की तुम्हाला पुढील जन्मी जे हवे असेल त्याचे या जन्मात दान करून टाका. म्हणजे पुढील जन्मात तेच तुम्हाला मिळेल. तुम्हाला पुढच्या जन्मी हाच पती पाहिजे आहे ना? तर ह्या जन्मी त्याचे दान करून टाका. हाच त्यावर उपाय आहे.' सत्यभामा म्हणाली ही गोष्ट बरीच सांगितली 'खरे तर सत्यभामा एवढी मूर्ख असूच शकत नाही. याचे कारण की भगवान् श्रीकृष्णची पत्नी होती! पण भावनेच्या भरात माणूस काय करून टाकेल हे काही सांगता येत नाही, ही पण गोष्ट खरी आहे.
नारद म्हणाले, 'पतीला ब्राह्मणाला देऊन टाका'. सत्यभामा म्हणाली, 'दान द्यायला हरकत नाही पण दान घेणार कोण?'
नारद उद्गारले, 'मी आहे ना!' सत्यभामाला तर वाटले नारादासारखा ब्राह्मण कुणाच्या समोर हात पसरणार नाही. आणि माझ्याकडून दान घेत असेल तर हरकत काय आहे? लगेच तिने पाणी आणले आणि उदक सोडले. 'घ्या. तुम्हाला मी यांचे दान देते.' सत्यभामा भोळी होती. त्यामुळेच तर तिच्या डोक्यात आले नाही की याचा काय परिणाम होणार आहे.
इतक्यात श्रीकृष्ण तिथे आले. त्यांनी दुरून बघितले आणि मनात म्हणाले की आज घरात नारद घुसला आहे म्हणजे काही ना काही कलागत झालीच असणार. नारद आला म्हणजे कोणाला सोडणार आहे? कृष्णाला आलेले पाहून नारद म्हणाले, 'चला! तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे.' कृष्णाने विचारले, 'पण घडले काय ते तर सांगा.' तर म्हणाले, तुम्ही मला दानात मिळाला आहात. म्हणजे माझे आहात. चला माझ्यासोबत.' दोन-चार पावले चालत गेल्यावर कृष्णाने विचारले 'अहो! तुमच्यासोबत येऊन मी करू काय? तुम्हाला मला काहीतरी काम तरी द्यावे लागेल.' नारदांनी डोके खाजवले आणि म्हणाले, खरे आहे तुमचे म्हणणे, पण माझ्यापाशी तर काही कामच नाही.' नारदांनी मनात विचार केला, कृष्णा सारख्याला दानात मिळवले खरे पण त्यांना सांभाळायचे कसे? नारद म्हणाले, 'माझ्यापाशी तर काही काम नाही,' आता करायचं काय? शेवटी नारदांनी सांगितले, 'या माझ्या खडावा माझ्या पायांना खुपत आहेत. त्या पायाला सारख्या लागतात. तर तुम्ही या खडावा उचलून घ्या ना!' 'श्रीकृष्णानी खडावा उचलल्या आणि आपल्या मस्तकावर ठेवून चालू लागले. 'नारदांच्या खडवांची धूळ जर माझ्या मस्तकावर पडली तर मी पवित्र होऊन जाईन' एक विशिष्ट जीवन जगून भगवंताला आपल्येसे बनवणारे जे लोक आहेत त्यापैकी नारद आहेत. त्यांच्याबद्दल भगवंताला पण असा भाव असेल तर लोकांना पण त्यांच्याबद्दल असा भाव असेल यात नवल नाही! म्हणून सतपुरुषांना तीर्थ गणले आहे. हे मोठ्यातल्या मोठ्या तीर्थ आहे.
Comments
Post a Comment