मैत्री
मैत्री
मला दुसरा पाहिजे, परंतु दुसऱ्याला मला सुख द्यायचा आहे की दुसऱ्याला माझ्या सुखाच्या साधन बनवायचा आहे? दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टि कोणती आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही लोकसंग्रह खूप केला, पुष्कळ लोक गोळा केले. परंतु त्यांच्याकडे बघण्याची तुमची दृष्टी कोणती त्याच्यावर स्नेहाचे मूल्य ठरते. स्नेहाची किंमत होणारच नाही पण त्याला मूल्य आहे. किंमत आणि मूल्य यांच्यात फरक आहे. एका परिवाराचे असणे, एका राष्ट्राचे असणे, राजनीतीत एका पक्षाचे असणे ह्या गोष्टी ऐक्य निर्माण करत नाहीत. त्याला ऐक्य म्हणायचे पण नाही. ऐक्यात एकमेकांसाठी तळमळ असली पाहिजे. आज आम्हाला चार पैसे पाहिजेत, त्यासाठी आम्ही एकत्र येतो. पण एकमेकांसाठी तळमळ नसते एकमेकांसाठी तळमळ कशी निर्माण होईल? केवळ एकत्र आल्याने तळमळ निर्माण होणार नाही. चौपाटीवर फिरण्यासाठी पुष्कळ लोक एकत्र येतात तसेच काही लोक स्वार्थ साधायला युनियन बनून एकत्र येतात पण ते एकत्र येतात. स्वार्थ साधण्यासाठीच जशी कामगारांची युनियन असते तसेच मालकांची युनियन , असोसिएशन असते. पण त्यात परस्पराबद्दल तळमळ नसते. स्वाध्यायाचे महत्त्व काय आहे, हे इथे तुमच्या लक्षात येईल. स्वाध्यायाचा अर्थ केवढा ऐकायचे असा नाही. कानाला ऐकणे आवडले म्हणून ऐकायला एकत्र आले! असा तमाशा रोज चालतो, त्यात आहे काय? ऐकायला जमणे वेगळे आणि स्वाध्यायाला जमणे वेगळे. अशी तळमळ उभी करायचे आहे की आम्ही एका परिवारातील आहोत. परंतु जर दोघा भावांना एकमेका विषय तळमळ नसेल तर काय तो परिवार आहे? तसे तर दोन बैलांना एका जागी बांधतात. दोघेही बैल एकाच गोठ्यात एकत्रच राहतात. एकत्र राहिले म्हणजे काय एकाच परिवारात झाले असे नाही. एकाच कुटुंबाचे असणे, एका राष्ट्राचे असणे असे घडू शकते. एखादा माणूस अपघाताने हिंदुस्तानात जन्माला आला असेल पण तो अपघात आहे. कुठे जन्म होईल हे त्याच्या हातात नव्हते. त्याला जर विचारलं असते तर तो म्हणाला असता की मला अमेरिकेत जन्माला घाला. राजकीय पक्षात सुद्धा लोक एकत्र येतात पण एकमेकाबद्दल त्यांना ओढ नसते. निरपेक्षितेने दुसऱ्याचे हित बघणे हे केवळ मित्रत्वात येते. हा विकास आहे. अपेक्षारहीत, वासनारहीत प्रेम करणे हा विकास आहे.
मैत्री कृष्ण अर्जुनासारखी असली पाहिजे कृष्णाला कुठल्याही कामात कमीपणा वाटत नव्हता कृष्णाने राजसुयज्ञात अर्जुनाकडे उष्ट्या पत्रावळ्या सुद्धा उचलल्या आहेत. आणि अर्जुनाचे सार्थ्यही केले आहे. त्याकाळी सार्थ्यही वेगळेच असायचे. आजच्या काळासारखे नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जानाचे सारथ्य केले त्यात त्याला कमीपणा वाटला नाही. बलवान दुबळ्याला मित्र मानेल तेव्हा त्याचे रक्षण करेल. त्याला असाह्य बनवणार नाही. मैत्रीत असा सुगंध आहे. चोराला चोरी करण्याचे व्यसन आहे तो दहा जणांच्या भिंती फोडून पैसा, संपत्ती, दागिने चोरी करेल, पण मित्राच्या घरी चोरी करणार नाही. मैत्रीचा हा सुगंध आहे.
Comments
Post a Comment