माहेर
.
माहेर
जीवनाच्या संध्याकाळी स्वतःच्या घरी जाण्याची तयारी केली पाहिजे. कसेही अtसले तरी आपले घर ते आपले घर. माहेर ते माहेर. स्त्रीला स्वतःच्या माहेरी जाताना केवढा आनंद होतो! साठ वर्षाची म्हातारी असली, सगळे केस पिकलेले असले, माहेरी आता काही राहिले नसले, सारे साफ झाले असले तरीही माहेरच्या गावी जायचे असले की ती आजारी असली तरी पटकन उभी राहते. तिला माहेरच्या गावी जायचे सुख वाटते तिला वाटते, की हे माझ्या वडिलांचे घर आहे त्यामुळे तिला माहेरी जाण्याची ओढ असते.
माणसाला परलोकात जाण्याचीही अशी उत्सुकता वाटली पाहिजे. तिथे जाण्याचे भय काढून टाकले पाहिजे. आपले विशिष्ट प्रकारचे जीवन असले तर भय निघून जाते. दुसऱ्याच्या घरात सर्व सुखसोयी असल्या तरी स्वतःचे घर ते स्वतःचे घर. जीवनाच्या संध्याकाळी माणसाने शांतपणे परलोकाचा विचार केला पाहिजे. त्यात भिण्याचे काही कारण नाही. भ्यायल्याने काही परलोके जाण्याचे टळू शकत नाही, ही गोष्ट पक्की आहे. आपले शास्त्रकार म्हणतात की तु भितोस कशाला? अरे मुला! तू भिऊ नकोस, तू सबंध बांधून ठेव आणि पुढे चालू लाग. फक्त तिथे जायचे म्हणजे थोडी बहुत तयारी करून ठेवली पाहिजे. त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचे जीवन जगले पाहिजे, सांस्कृतिक जीवन जगले पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात बसले पाहिजे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती यामध्ये माणूस विकृतीचे जीवन पकडून बसला आहे. त्याला जरा प्रकृतीपाशी, संस्कृतीपाशी जाण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment