पातकी दुनियेचा कल आणि हेतू
पातकी
भगवान करुणामय, प्रेममय आणि शक्तीपूर्ण आहे. आपण केवढी पातके केली असतील! मानवाचा जन्म घेतला परंतु गाढवासारखे राहिलो. ऐंद्रिय सुखाच्या मागे गुलाम बनून धावत राहिलो. हे केवढे मोठे पातक आहे. कशा प्रकारे राहावे याची समज असली पाहिजे. मानवी शरीरात राहून काय करायचे हा विचारच ज्याने केला नाही, त्याला काय म्हणायचे? मानव बनून राहिला नाही. मानव ही भगवंताची अंतिम कलाकृती आहे तरीही त्याने ती ठुकरावली हे फारच मोठे पातक आहे.
आम्ही चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही म्हणजे आम्ही पातकी नाहीत असे आपण समजतो. चोरी करणे, व्यभिचार करणे त्यालाच आपण सामाजिक पातके समजतो; जे लोक ह्या गोष्टी करत नाही ते पातकी नाहीत अशी आपली समजूत आहे. वास्तुत: असे नाही. मिळालेल्या शरीराचा उपयोग केलास? मिळालेल्या बुद्धीचा उपयोग केलास? भगवंतासाठी शरीर आणि बुद्धीचा उपयोग केलास? स्वतःचे निपुणता भगवंताच्या पायी प्रामाणिकपणे वाहिलीस? भगवंताने दिलेले वित्त भगवंतासाठी वापरलेस? असा विचार कराल तेव्हा कळेल की पाप कशाला म्हणतात? अशी पातके केल्यावरही भगवान आपल्यावर करुणा करतो.
ज्याने भगवंताची उत्कृष्ट कलाकृती निरूपयोगी ठरवली आणि पशु सारखे जीवन जगला. 'कमवायचे, खायचे, झोपायचे, मुला-मुलींची लग्न लावायची' यासाठीच जर मानवी शरीर वापरायचे तर मग पशु याहून वेगळे काय करतो? हे एक नैतिक पातक आहे.
Comments
Post a Comment