उन्नत जिवन हे कसे पाहिले जाते ?
उन्नत जिवन
भगवंत सर्वत्र आहे असे उपनिषद् सांगत आहे. भगवंत माझ्यात आहे ही पहिली पायरी आहे. भगवंत दुसऱ्यात पण आहे ही दुसरी पायरी आहे. दुसऱ्या जवळ जायचं आहे, घ्यायचं काही नाही आणि द्यायची काही अभिलाषा पण नाही आणि देतो असा अहंकार पण नाही, तरी दुसऱ्याला भेटायचं आहे. भेटण्यासाठी काहीच कारण नाही तरी भेटायचं आहे, म्हणजेच भक्तीच्या दृष्टीने भेटायचे आहे. जो भगवान् माझ्यात आहे तोच भगवान् त्याच्यात पण आहे. म्हणून ज्याच्या जवळ जायचं आहे त्याची दृष्टी बदलायची आहे. त्याला समजवायचे आहे की दुःख, दैन्य, दारिद्र्याची मागणी मनात ठेवणे तुला शोभत नाही. माझ्यात भगवंत आहे, मग मी जर दिन बनलो तर ते मला शोभणार नाही आणि माझ्या आत बसलेल्या शक्तीला ते आवडणार नाही.
जीवनातून दुःख, दैन्य, दारिद्र्य कसे काढू? स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याने, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याने दुःखाची तीव्रता कमी होते, दैन्य निघून जाते. तुझ्याजवळ मोटार नाही, तुझ्याजवळ बंगला नाही असे सांगून सगळे आपल्याला रडवत असतात. माझ्याजवळ काय आहे याची नोंद कोणी घेत नाही पण माझ्याजवळ काय नाही ते मला दाखवत असतात. लोक दाखवोत वा न दाखवोत पण माझ्याने ते सहन होत नाही.
जसे स्वतःकडे बघण्याची दृष्टी दैन्याची आहे, तशी दुसऱ्याकडे बघण्याची दृष्टि पण दैन्याची आहे. दानात, धर्मात, भक्तीत वगैरे सर्व ठिकाणी दैन्य आहे. आपण अवस, विवश, परवश बनवून भक्ती करत असतो. अशाप्रकारे आपल्या भक्तीत दैन्य घुसले आहे. काही विचार करून, बुद्धीने, भावाने, प्रेमाने भक्ती करण्याची आपली तयारी नाही. भगवंताबद्दल बौद्धिक प्रेमाची आपल्याला जाणच नाही. सगळ्याच क्षेत्रात दैन्य आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आतला राम प्रसन्न होईल.

Comments
Post a Comment