भगवंताचे अस्तित्व.
रडायचे कशाला?
आज लोक विविध प्रकारच्या दुःखाने दुःखी आहेत. सर्व म्हातारे तर फारच दुखी आहेत. कथाकारांनी जन्माचे एक घृणास्पद चित्र उभे केले आहे. नऊ महिने आईच्या पोटात, अंधार्या कोठडीत राहावे लागते.
पुनरपी जननं पुनरपी मरणं पुनरपि जनानी जठरे शयनम्|
परंतु जेव्हा भक्ती उभी राहते तेव्हा तसे वाटत नाही. माझ्याबरोबर माझा प्रभू आहे ही समज नसेल तर माणूस म्हणतो मला जन्म नको. आज मुक्तीच्या मागे पुष्कळ लोक लागले आहेत. सर्व लोक आईच्या पोटातून जन्माला आले आहेत. कोणी आकाशातून पडलेला नाही. कुणाला गर्भवासाचे दुःख आठवते ?तुम्हाला त्याचा अनुभव आहे का? तुमचे अनुमान आहे की दुःख आहे पण त्याचा अनुभव नाही. मग रडायचे कशाला? रडविणारा रडवतो आणि आपण रडू लागतो? भगवंता! मला जन्म पाहिजे जननी जननं यातु मम वै अशी दृष्टी श्रीमद् आद्य शंकराचार्य देतात.
काही लोकांना उपजीविकेचे दुःख आहे. भाकरी मिळेल की नाही? आज तर भाकरी मिळते आहे, उद्या मिळेल काय? आज माझी परिस्थिती चांगली आहे, पण दहा वर्षानंतर माझी स्थिती कशी असेल? काही सेफ डिपॉझिट मध्ये आहे की नाही? असा विचार करत असतात. अरे !
जब दंत न थे तब दूध दियो
अब दंत दिये सो अन्न न दे ?
जन्मलेल्याला दात नसतात तेव्हा आईच्या स्तनात भगवंत दूध देतो. मग आता दात दिले तर अन्न नाही देणार? जन्मल्यावर बालक पहिला श्वास कसा काय घेत असतो हे एक कोडेच आहे. आईच्या स्तनात भगवंताने दूध ठेवले ते भगवंताचे प्रेम समजा म्हणजे दुःख निघून जाईल. आईच्या स्तनात काही आईने दूध निर्माण केले? जर आईने निर्माण केले म्हणाल तर दोन वर्षाचा मुलगा झाल्यावर मग स्तनातून दूध काढून दाखवावे! आईच्या स्तनात दुध ना आईने निर्माण केले ना बापाने निर्माण केले आणि ना लहान बालकांने, मग कोणी निर्माण केले? तर ते दूध आईच असताना भगवंताने निर्माण केले.
काही लोकांना भवसागराचे दुःख आहे. असे तोंड करून बसतात की विचारू नका! पुन्हा जन्म न यावा असा रस्ता दाखवा असे म्हणतात. त्यांना करायचं काही नसते. त्यांना भगवान् मिळाला पाहिजे असे वाटते पण त्यासाठी साधना करायला तयार नाहीत. कोणी बाबा विभुती लावेल आणि भगवंताचे दर्शन करवील असे त्यांना वाटते. लोक गतानुगतिक आहेत. ते शास्त्रकारानी सांगितलेल्या रस्त्याने चालत नाहीत. त्यांना भवसागराची भीती आहे.
Comments
Post a Comment