तीर्थ - सद्ग्रंथ
सद्ग्रंथ
ग्रंथात कल्पना असते आणि अनुभव असतो. जे ग्रंथ कल्पनात्मक असतात त्यांच्यात उदा . गुणवंतराव आणि गुणवंती ताई यांच्यात प्रेम कसे जमले मग लग्न कसे झाले? कादंबरी संपली. दुसरे अनुभवात्मक लिखाण असते. ज्ञानेश्वरी वाचाल तर त्यात अनुभवभावात्मक लिखाण पाहायला मिळेल. अशा अनुभवात्मक ग्रंथांनाच सदग्रंथ म्हणतात. ग्रंथात काय आहे हे पाहिलं पाहिजे. जो आपल्याला तेजस्विता देईल, भाव वृद्धी करेल, जीवनाची दृष्टी देईल आणि जीवनातीत असलेल्याचा संबंध समजावेल त्या ग्रंथालाच आपण सद् ग्रंथ म्हणतो. तो ग्रंथ पूजनिय गणला जातो. सदग्रंथ सतत वाचल्याने आपले जीवन कसे बदलते ते आपल्याला कळतही नाही आणि जीवन बदलत जाते. ग्रंथातही ताकद आहे.
ग्रंथ आपल्यावर परिणाम केव्हा करतात? ग्रंथाच्या लेखकावर आपले अत्यंत प्रेम असेल तर. गीता वाचतांना कृष्णावर अत्यंत प्रेम असले पाहिजे, तरच गीता तुमच्याशी बोलेल नाहीतर गीतेचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही पहिली गोष्ट दुसरे म्हणजे जे लिखाण आहे त्याबद्दल अत्यंतिक भाव पाहिजे. त्या ग्रंथाबद्दल भाव उभा केला नाही. आपल्या पूर्वजांनी ग्रंथाबद्दल भाव उभा केला आहे. वेदाबद्दल भाव उभा केला आहे. आरे वेद जाऊ द्या, शेवटी पुराण ग्रंथ दिले त्याबद्दल सुद्धा भाव उभा केला आहे. भागवत पुराणग्रंथ आहे. भागवताची पोथी घेऊन जाताना स्रिया पोथी डोक्यावर घेऊन जातात. त्याचा अर्थ असा आहे की हे जे लिखाण आहे त्याबद्दल माझा अंतकरण एवढा भाव आहे की त्याला डोक्यावर घेईन.
ग्रंथावर तुमचा भाव असेल तरच ग्रंथाच्या ओळी तुमच्याशी बोलतात नाही तर नाहीच बोलत. ग्रंथावर भाव पाहिजे. काही लोक गीतेला सन्मानाने 'गीताजी' म्हणतात. गीतेवर भाव असेल तर गीता आपल्याशी बोलेल नाहीतर नाही. गीता माझा ग्रंथ आहे. हे माझ्यासाठी लिहिलेले प्रेमपत्र आहे. गीतेचे पारायण करताना असे वाटले पाहिजे की गीता माझी आहे. भगवंतांनी गीता माझ्यासाठी लिहिली आहे. आपल्याला तर असे वाटते की गीता सर्वांसाठी लिहिले आहे गीता माझ्यासाठी लिहिली आहे. असे वाटले तर गीता तुमच्याशी बोलेल. तुम्हाला पारायण करताना ही आनंद होईल.
Comments
Post a Comment