निर्भयता - घंटासू राक्षसाच्या गोष्टीतून निघालेला बोध.
वेदांताच्या गोष्टीतील हा हुशार माणूस दयाळू होता. त्याने घंटाच फेकून दिली. म्हणून आवाज येणे बंद झाले, सगळे भयमुक्त झाले. आपल्या जीवनाची कथा वेगळी आहे. इथे तुम्ही जे विविध आवाज उदा. वात्सल्याचे, प्रेमाचे, भावनेचे आवाज ऐकता ते कुठून येतात हे कळत नाही, कोण काढतो कळत नाही म्हणून आपण घाबरलेलो आहोत . आद्य शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आवाजाच्या अनुरोधाने चालत गेले. तेव्हा त्यांना कळले की गोपाळकृष्णच मुरलीतून हे आवाज काढतो आहे. हे महापुरुष भगवंतापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी आतल्या आत नक्की केले की आवाज कुठून येतात ते आपल्याला कळले आहे, पण आपण कोणाला सांगायचे नाही. याचे कारण असे की हे सगळ्यांना सांगितले तर भगवंताचा खेळच खलास होऊन जाईल. भगवंत त्याच्याजवळ आलेला महापुरुषांना म्हणतो, तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्हाला सगळे समजले, आता इथेच बसा, आपण न्याहारी करू. परंतु तुम्हाला जे समजले ते सगळ्यांना सांगू नका. हे महापुरुष भगवंताला शब्द देऊन आले आहेत. म्हणून त्यांना कोणी विचारले , तुम्हाला भगवंत भेटला? तर ते म्हणतात नाही रे बाबा, आम्हाला भगवंत भेटला नाही. शंकराचार्य, वल्लभाचार्य अशा महापुरुषांना विचारलं तर ते धडधडीत खोटे बोलतात, त्यांना सर्व समजले आहे पण हे लोक तिकडे सही करून आले आहेत की त्यांना देव भेटला आहे हे ते कोणाला सांगणार नाही. म्हणून नेती नेती म्हणतात. ते जगात आले आणि निर्भयतेने फिरले. सर्व जग भयभीत आहे आणि हे महापुरुष निर्भय आहेत. याचे कारण विविध आवाजाचे मूळ त्यांनी शोधून काढले आहे.तेच ज्ञान आहे. ज्ञानाने त्यांचा संशय नाहीसा झाला. तिथे कोणी राक्षस नाही. तिथे गोपाळकृष्ण मुरली मधून विविध आवाज काढतोय.
Comments
Post a Comment