गुढीपाडवा - मलबारात गुढीपाडवा सण कसा साजरा केला जातो ?
मलबारात गुढीपाडवा
मलबारात हा उत्सव विशिष्ट रीतीने साजरा केला जातो. घरच्या देवघरात सर्व संपत्ती व शोभायमान वस्तू व्यवस्थित रित्या मांडण्यात येतात. पाडव्याच्या दिवशी पहाटे उठून घरातील आबाल वृद्ध सर्व डोळे मिटून देवरात जातात. तेथे जाऊन स्वतःचे डोळे उघडून गृहलक्ष्मी सहित देवाचे दर्शन घेतात. घरातील मुख्य वडील संपत्ती व ऐश्वर्या यांनी सुशोभित अशा ग्रहदेवतेला आरती ओवाळतो.
मलबार मधील रिवाजामागे देखील भारतीय संस्कृती डोकवताना दिसते. पहाटे उठून 'कराग्रे वसते लक्ष्मी: करमते सरस्वती ' हा श्लोक म्हणता म्हणता हातात असलेल्या देव देव-देवतांचे दर्शन करावे असे जे संस्कृतीने सांगितले आहे, त्या संस्कृतीच्या सुरात, 'वर्षाच्या पाहटेला' म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी गृहलक्ष्मीने युक्त देवाचे प्रथम दर्शन करावे असेच ही रूढी सांगत आहे. पहाटे शुभदर्शन करणाऱ्याचा दिवस चांगला जातो अशी आपली मान्यता आहे. वर्षा आरंभाच्या दिवशी प्रभूचे दर्शन करणाराचे वर्ष चांगले जाते. यात नवल कसले!
शिवाय सर्व संपत्ती देवघरात प्रभूच्या पायाजवळ ठेवण्यात येते. हा रिवाज भारतीय लोकांच्या ईश्वरा अर्पण बुद्धीची कल्पना देतो. जी काही संपत्ती धन, वैभव किंवा ऐश्वर्य प्रभुने मला दिले आहे ते प्रभुच्या चरणावर वाहून प्रसाद रूपात भक्तीच्या भावनेने त्याचा स्वीकार करायचा. समर्थ गुरु रामदासांना समर्पित केलेले राज्य प्रसाद रुपात परत मिळाल्यावर ज्या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य शासन केले त्याच भावनेने वर्षभर, प्रभुने पाठविलेल्या ऐश्वर्याचा उपभोग घ्यायचा; असे हा रिवाज सुचवितो.
Comments
Post a Comment