तीर्थ - गंगातीर्थ
गंगातीर्थ
गंगातीर्थे हे जाणिवेचे, समजुतीचे तीर्थ आहे. समज निर्माण झाली पाहिजे. समज आणि ज्ञान यात फरक आहे. ज्ञानियांचे घरी भक्तीचा दुष्काळ| केवळ ज्ञान्याला फार मोठी किंमत नाही. ज्ञानासोबत समज असली पाहिजे. भगवान् सर्वव्यापक आहे हे ज्ञान आहे. खरोखर, या जगात मुंगी देखील भगवतशक्तिशिवाय हलू शकत नाही, हे ज्ञान आहे. मी सुद्धा भगवतशक्तिशिवाय हलू शकत नाही, ही गोष्ट माणूस विसरून जातो. सृष्टी माझ्यापासून सुरू होते. मी माझा हात उजवीकडून डावीकडे हलवतो हे सुद्धा भगवंत शक्तीने. अर्थात् भगवंत माझ्या सोबत आहे, माझ्यात आहे, माझ्याजवळ आहे. ही समज ज्यांना आली ते लोक हळूहळू सुखप्रवाह आणि प्रेमप्रवाहातला फरक समजू शकतात.
आपण बोलतो की भगवंत सर्वत्र आहे, नदीत आहे, समुद्रात आहे, पर्वतात आहे, सर्वच ठिकाणी आहे. सर्वत्र भगवंत असेल तर माझ्यात कसा नसेल? माणसाला सर्वांच्यात भगवंत आहे ही समज आली आहे तरीही तो रडतो आहे. सर्वांच्यात भगवंत असेल तर मला सोडून भगवंत कसा राहील? स्वतःमध्ये सुद्धा भगवंत आहे याचा विचारच माणूस करत नाही. म्हणून तो उगाच रडतो आहे. त्याला फक्त एवढे सांगायचे की सर्वांच्यात भगवंत आहेत तर स्वतःपासूनच सुरुवात कर. हे त्याला दाखवायचे आहे. भगवंत माझ्यात आहे, माझा आहे, माझ्यासोबत आहे. अशी समज निर्माण झाली तर सुखप्रवाहापेक्षा प्रेमप्रवाह समजणे सोपे जाईल. भगवंताच्या सामीप्याची समज निर्माण झाली पाहिजे. या समजुतीचे तीर्थ ध्यानात आले पाहिजे.
सत्पुरुषांच्या संबंधाचे तीर्थ हे मोठ्यातले मोठे तीर्थ आहे. सतपुरुषाला ओळखणं कठीण, पाहायला मिळणे कठीण, भेटणे कठीण आणि कदाचित भेटला तर त्यांच्यासोबत आपला संबंध जुळणे कठीण. त्याच्यासोबत संबंध जुळला पाहिजे. सुखप्रवाह आणि प्रेमप्रवाहाला वेगळे करण्यासाठी हे सगळे करायचे आहे. आपण नक्की कुठे आहोत हे ध्यानात आले पाहिजे. कोण करतो? असक्तीरहित कर्मे घडत नाहीत. आतला जो 'मी' आहे तो आणि कर्मेंद्रिये आहेत त्यांच्यातला 'मी' च भगवंताने उचलला पाहिजे.
असक्ती सोडून कर्म करायचा हा अर्थ बरोबर आहे. सामान्य रीत्या फलासक्ती न राखता माणसांनी कर्मे करणे अपेक्षित आहे. त्यात काही चूक नाही पण कर्म करताना फलासक्ती गेली तरीपण कर्तव्यासक्ती राहते, कर्मासक्ती राहते. म्हणजे असक्ती तर राहतेच. 'प्रेम' आणि 'पाहिजे' असे वाटले तरच आसक्ती निर्माण होते. 'प्रेम' आणि 'पाहिजे' नसेल तर माणूस कामच करू शकणार नाही. कार्मासाठी प्रेमही असायला हवे आणि पाहिजेही वाटायला हवे. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टींविषयी प्रेम नाही आणि दुसरी एखादी गोष्ट पाहिजे असं वाटत नाही तर तुम्ही क्रियाशील होणारच नाही. आसक्ती सोडून कर्म करा.
सत्पुरुष सबंधाचे तीर्थ आहे. ही समज कशी काय निर्माण होईल? अपघाताने भगवंताची कृपा झाली असे घडत नाही. सतपुरुषावर भगवंताची कृपा होते आणि तुझ्यावर कशी होत नाही? तुझ्यावर अवकृपा होते असे कोणी सांगितले? तुझ्यावर जर भगवंताचे अवकृपा असेल तर तू बोलू तर शकशील काय? सत्पुरुषाने एक विशिष्ट विकास साधला आणि तू तसा विकास साधलेला नाहीस ही हकीकत आहे.सत्पुरूष संबंधाचे तीर्थ ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यांचा प्रभू वरती पराकाष्ठेचा विश्वास आहे असे हे लोक आहेत.
सत्संगती माणसाला काय बनवत नाही? असा प्रश्न विचारला जातो. ती माणसाला भगवान् पण बनवू शकते. पण सतचा संबंध समजला पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे.
भगवंतासाठी अविश्रांत काम करणाऱ्या लोकांना आपल्या शास्त्रात फार मोठी किंमत आहेत. हे लोक भगवंतापासून येऊन जाणारे लोक आहेत. ते आपल्यात भाव निर्माण करतात. समज, जाणीव होण्यासाठी दोन गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. जबरदस्त भाव निर्माण झाला पाहिजे आणि उत्तमात उत्तम प्रकारचे शक्तिशाली ज्ञान निर्माण झाले पाहिजे. या दोन्ही गोष्टी केवळ शिक्षणाने येत नाहीत. घोकून पण येत नाहीत. या गोष्टी संक्रांत होतात. वेदान्तात पुढे जाल तर कळेल की प्रेमाच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होत जाते. महापुरुष प्रेमाच्या प्रवाहाचे प्रक्षेपण करतात. तेही नकळत घडते. ते स्वीकारण्याची आपली ताकद असली पाहिजे. तर आपल्यात भाव उभा राहील.
Comments
Post a Comment