तीर्थ - विद्यातीर्थ
आपण सध्या बाल वर्गात असू, पण कर्मचा स्थितीवर जाण्याचा विचार तर असावा ना? त्यासाठी सप्तकुंडात स्नान करायचं. ही सप्तकुंडे कोणती?
विद्यातीर्थ जगति विबुधा: साधव: सत्यतीर्थ गंगातीर्थे मलिनमनसो योगिनो ध्यानतीर्थे|
धारातीर्थे धरणिपतयो दानतिर्थे धनाढ्या: लज्जातीर्थे कुलयुवतय: पातकं क्षालयन्ति||
या सप्तकुंडात न्हावे लागेल.
1. विद्यातीर्थ
हे पहिले तीर्थ आहे. त्यात जोपर्यंत आपण न्हात नाही तोपर्यंत पुढे जायचा रस्ताच मिळत नाही. आपले जीवन कशाने बदलते? विचारानी बदलते. विचार कुठे मिळतात? विद्याप्राप्तीने विचार मिळतात. सामान्यविद्या आहे तशी अध्यात्मविद्या आहे. विचार जीवनाला बदलू शकतात. तुम्हाला जीवन भाववान् बनवायचा असेल तर विचारानी ते होते. जीवन वेगवान् बनवायचे असेल तर विचार तसे जीवन बनवू शकतात. क्रोध निर्माण करायचा असेल तर तोही विचारानीच साधतो. काव्य निर्माण करायचे म्हटले तर आधी विचार करावा लागतो. माणूस जर कामासक्त बनला तर आधी डोक्यात परिणाम होतो आणि कामासक्ती निर्माण होते. विचार बदलले तर जीवन बदलते. विचार नाही बदलले तर जीवन बदलत नाही. विचारही फार मोठी शक्ती आहे. आपण भगवंताला नमस्कार करतेवेळी भगवंतासमोर माथे नमवतो. 'भगवंता! तू माझे विचार वाच.' हा भाव त्यामागे आहे.
विचार जितके प्रभावी असतील तितके जीवन प्रभावी असेल. विचार जितके तेजस्वी असतील तितके जीवन तेजस्वी असेल. विचार जितके भाववाहीअसतील तितके जीवन भाववाही बनेल. विचार जितके उन्नत असतील तितके जीवन उन्नत होईल. विचार माणसाला बदलू शकतात. एक जीवन नव्हे तर दहा जीवने लागली तरी चालतील परंतु प्रभुपाशी पोहोचू शकतो असे विचार मस्तकात भरले पाहिजेत. विचार बदलायचे ही पहिली गोष्ट. विद्येने विचार बदलतात. हे विद्यातीर्थ आहे.

Comments
Post a Comment