हनुमान जयंती - हनुमानाच्या जीवनात रामाचे असलेले स्थान.

हनुमान जयंती 
हनुमान रामाचा पूर्ण भक्त होता
             हनुमंता जवळ स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञाशक्ती होती. अशोकवाटिकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या सीतेला प्रभू रामचंद्रचा समाचार सांगण्यापूर्वी त्याने झाडामागे उभे राहून इक्ष्वाकुळाचे वर्णन सुरू केले. हनुमंताने मानसिक भूमिका तयार करून सीतेच्या हृदयात विश्वास निर्माण केला; त्यानंतरच रामदूत म्हणून स्वतःचा परिचय करून दिला.
            लंका-दहन हे काही हनुमंताची माकड चेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पूर्ण विचार करून केलेले कृत्य होते. लंका दहनांमध्ये पूर्ण राजनीती आहे. त्याच्याद्वारे त्याने लंकेतील राक्षस प्रजेचा आत्मप्रत्यय खलास केला. लंका दहन करून हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पुरे केले आहे.
           हनुमान रामाचा पूर्ण भक्त होता. तो प्रत्युत्पन्नमती होता. रामाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता‌. रावणाला मारल्यानंतर सीतेला संदेश पोहोचविण्यासाठी राम हनुमंताला पाठवतो. कारण आनंदाचा समाचार सरळ कळला तर कदाचित हृदय बंद पडून जाईल‌. आयोध्यात प्रवेश करण्यापूर्वी भरताच्या चेहऱ्यावर रामाच्या आगमनाचा विकार होतो की नाही ते पाहण्यासाठी देखील राम हनुमंतालाच पाठवतो. अर्थात या नाजूप्रसंगी महत्त्वाचे कामगिरी पूर्ण बुद्धी चालवून हनुमानच करू शकतो. नाजूकात नाजूक व कठोरात कठोर कामही हनुमान सफलतेने पार पाडीत असे.
          हनुमंताचा दास्य भावही अतिशय उत्कृष्ट आहे‌. राम हनुमंताला विचारतो: 'तुला काय पाहिजे?' त्यावेळी, 'माझी तुमच्यावरील प्रेमभक्ती कमी न व्हावी आणि रामाशिवाय दुसरा भाव न निर्माण व्हावा एवढेच पाहिजे' असे उत्तर त्याने दिले होते. जोपर्यंत राम कथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहील.
        हनुमान म्हणजे सेवक व सैनिक यांचा सहयोग! भक्ती व शक्ती यांचा सुबह संगम! रामाच्या सेवेत प्राण देण्याची जरूर पडली तर त्यासाठी त्याची तयारी होती. तसे पाहिले तर रामायणात हनुमंता एवढाच रावनही बलवान होता. पण रावणाचे बल भोगाला अर्पण केलेले होते. एकाने राम पत्नी पळून नेली, दुसऱ्याने ती परत शोधून काढली. भक्तीशून्य शक्ती माणसाला राक्षस बनवते, तर भक्तीयुक्त शक्ती मानवाला देवत्व प्रदान करते. या गोष्टीचे सुंदर दिग्दर्शन वाल्मिकीने रामायणात या दोन पात्रांच्या चरित्रचित्रणाने केले आहे.
          आज ठीक ठिकाणी रावण व कुंभकर्ण भरलेले आहेत. यावेळी रामाचे काम करणाऱ्या हनुमंताची गरज आहे. रावनी विचार व वृत्ती यांचे दहन करणाऱ्या वीर मारुतीची गरज आहे. रामाच्या संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या दास मारुतीची आज समाज मागणी करत आहे. तसे होण्याचा प्रयत्न करणारेच हनुमान जयंती साजरी करायला अधिकारी आहेत. आपण तर आज दोन पैशाच्या तेलात व एक आण्याच्या माळेत हनुमंताची किंमत करून टाकली आहे! शनिवारी एवढे करून शेंदुराचा टिळा लावण्यात आपले सर्व भक्ती जणू येऊन जाते! रामाच्या सैनिकांची ज्यावेळी गरज आहे अशावेळी आपण झोपून राहिलो तर ते चालणार नाही. आपल्याला उठावे लागेल, जागावे लागेल, हनुमंताप्रमाणे राम कार्यासाठी कटीबद्ध बद्ध व्हावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन