पुरुषोत्तम हनुमान
पुरुषोत्तम हनुमान
जगातील सात चिरंजीवात ज्याची गणना आहे अशा श्रीराम- भक्त हनुमंताचा जन्म चैत्रशुद्ध पौर्णिमेला झाला. शंकराचे शिवालय जसे नंदी शिवाय असत नाही तशी श्रीरामाच्या देवालयाची पूर्णतः हनुमंताच्या मूर्ती शिवाय पूर्ण होत नाही. भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन या घटनेवरून होते.
रावणाच्या लंकेत जायला भगवान रामाला पुल बांधावा लागला तर हनुमान उड्डाण करून गेला. हनुमंताच्या उड्डाणाने भक्ताचा महिमा वाढला. मुलाच्या पराक्रमाने बाप आनंदित होतो, शिष्याकडून हरण्यात गुरु गौरव मानतो, तशी भक्ताच्या महिमावृद्धीमध्ये प्रभू प्रसन्नताच अनुभवतो. ज्याचे चिंतन भगवान करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहे. माणसे तर त्याचे चिंतन करतीलच. आज हजारो वर्षापासून जनसमुदायाच्या हृदयात रामा एवढेच आदरणीय स्थान हनुमंताला लाभले आहे.
उत्तरकांडात राम हनुमंताला प्राज्ञ, धीर, वीर, राजनीती निपून वगैरे विशेषणांनी संबोधतो, यावरूनच त्याचे उच्चतम योग्यतेची कल्पना येऊ शकते. हनुमान सीतेचा शोध करून आला त्यावेळी श्रीराम म्हणतो: हनुमंता! तुझे अगणित उपकार आहेत. त्याच्यासाठी माझा एक एक प्राण काढून दिला तरी ते कमीच पडेल. कारण तुझे माझ्यावरील प्रेम पंचप्राणापेक्षा विशेष आहे, म्हणून मी तुला फक्त आलिंगनच देतो. राम म्हणतो की, हनुमंताने इतके दुष्कर कार्य केलेले आहे की, इतर लोक ते स्वप्नातही करू शकणार नाहीत. धन्य हनुमान की, जो वानर असूनही, ज्याने प्रभूच्या स्वमुखातून 'पुरुषोत्तम' पदवी प्राप्त करून प्रभूच्या बरोबरीचे स्थान प्राप्त केले!
Comments
Post a Comment