वात्सल्यता - भय की प्रेम ?
भाग.1 निर्भयता
जीवनात वेगवेगळे आवाज आपल्याला धाववितात. भगवंताचे संगीत खूपच मोठे आहे. त्या संगीता मधून ज्याच्यासाठी तो आवाज असतो त्यालाच तो ऐकू येतो. इतरांना तो ऐकू येत नाही. इथे एवढे लोक बसले आहेत, प्रत्येकाला काही आवाज ऐकू येतात.
कोणाला मुलाचा, कोणाला पत्नीचा, कोणाला मित्राचा आवाज ऐकू येतो. वात्सल्याचा आवाज आहे, भावयुक्त आवाज आहे तसाच कौर्याचा पण आवाज आहे. हे आवाज निघतात, ऐकू येतात त्यामुळे माणसाला धावावे लागते. आपण सर्व घाबरलेला आहोत. एक जण म्हणतो, जग खराब आहे. कुणावर अंतकरणापासून प्रेम करू नये. माझ्या मुलावर मी किती प्रेम केले! तो घरी येत नसे तोवर मी जेवत पण नव्हतो. त्याचे पण माझ्यावर प्रेम होते. एके दिवशी तो थाटामाटाने एका मुलीला घरी घेऊन आला. म्हणजे त्याने लग्न केले. ज्या दिवशी तो मुलीला घेऊन आला त्या दिवसापासून तो मला लाथा मारीत आहे. तो माझ्या प्रेमापासून पूर्णपणे विमुख झाला आहे. म्हणून या जगात कोणावर प्रेम न करणे चांगले.
माणूस वात्सल्याने पण घाबरलेला आहे, प्रेमाने पण घाबरलेला आहे. हे विविध आवाज कुठून निघतात ते बघायला हवे, जाणून घ्यायला हवे. आवाजांना घाबरून चालणार नाही. त्यांचा तिरस्कार करूनही चालणार नाही. जो हे आवाज काढतो त्याची मुरलीच खेचून घ्या म्हणजे आवाज बंद होतील. हा एकच रस्ता आहे. त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानसछिन्नसंशयम्| त्याच्या हातातून मुरलीच काढून घ्या, मग आवाजच निघणार नाहीत.
Comments
Post a Comment