कौटुंबिक आदर्श - राम राज्यात असणारी कुटुंब पद्धत.
कौटुंबिक आदर्श
राम आपल्या सर्वांसमोर एक कौटुंबिक आदर्श ठेवून गेला आहे. दुसरे तीन बंधू होते तरी त्यांच्यामध्ये कधी भांडण झाले असे आपण कधी ऐकले नाही कारण त्यागात पुढे व भोगात मागे हा त्यांचा जीवन मंत्र होता. स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा म्हणजे राम. जेथे नेहमी दुसऱ्याचा विचार करण्यात येतो, त्यागाची तयारी ठेवण्यात येते, तेथे क्लेश, भांडण, झगडा ही शेकडो योजने दूर राहतात.
रामाची मातृपितृभक्ती तर खरोखर अनुकरणीय आहे. वनात जाण्याच्या पित्याच्या आज्ञांचे राम थोडे देखील दुःख किंवा का कू न करता पालन करतो. राज्याभिषेकाची गोष्ट ऐकताना किंवा वनात जाण्याचा आदेश स्वीकारताना रामाच्या चेहऱ्यावरील भावसारखेच होते. कोठे वसुंधराचे राज्य आणि कोठे वनवास! वाल्मिकी सांगतात: वनवासाची आज्ञा ऐकून राम जरा देखील व्यथित झाला नाही.
वडिलांचा शब्द तात्काळ मान्य. अशा प्रकारची प्रसन्नता म्हणजेच राम. सकाळचा पाच ते सात पर्यंतचा वेळ रामाच्या आठवणीसाठी राम प्रहर नावाने यासाठीच संबोधिला जातो. अधिक तर लोक त्या काळात प्रसन्न असतात. शिवाय ज्या कैकयी मातेमुळे हा प्रसंग उपस्थित झाला त्या मातेबद्दल थोडाही व्देष, मत्सर न ठेवता राम नमस्कार करायला जातो आणि पहिल्या एवढे प्रेम ठेवून बोलतो; ही घटना रामचरित्राच्या भव्यतेचे दर्शन करून देते.
राम-सुग्रीवाची मैत्री ही आदर्श होती. तुझ्यासारखा मित्र कोठे सापडणार नाही. असे राम सुग्रीवाला सांगतो. परस्परांच्या शक्तीचे प्रमाण पूर्णपणे जाणणारे राम व सुग्रह एकमेकांची कामे मोठ्या आनंदाने करीत होते. वालीला मारण्यासाठी राम सुग्रीवाला मदत करतो आणि रावणाला मारून सीतेला परत आणण्याच्या कामात रामाला मदत करतो. सुग्रीवावर रामाचे अपार प्रेम होते. सुग्रीवातही त्याने अभेद्य भावना साधली होती. सुग्रीवाला जरा जरी दुःख झाले तरी रामाच्या नेत्रात पाणी येत असे. रामाने स्वतःमध्ये व सुग्रीवामध्ये थोडा देखील भेद पाहिला नाही. म्हणूनच राम जेव्हा शरयू मध्ये प्रवेश करतो त्यावेळी किष्किंधेहून सुग्रीव धावत येतो व स्वतःही रामाबरोबर शरयूमध्ये प्रवेश करतो. मति कुंठीत व्हावी असे हे मित्र प्रेम आहे.
Comments
Post a Comment