राम - मर्यादापुरुषोत्तम


 मर्यादापुरुषोत्तम
         विचारात, विकारात व व्यवहारिक सर्व कार्यात ज्याने मानवी मर्यादा सोडली नाही, म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात.
     मानवाने राम बनण्याचे ध्येय व आदर्श राखावा यासाठी महर्षी वाल्मिकीने रामाचे चरित्र चित्रण केले. सदगुणांचे शिखर व त्यांचा समुच्चय म्हणजे राम. राम, 'हे गुण माझ्यात आणीन व मी राम बनेन' अशी महत्त्वकांक्षा प्रत्येक मानवाच्या मनात निर्माण होण्यासाठी ऋषींनी हातात धरली. धर्मापरायण रामाची पालखी खांद्यावर घेऊन आज सर्वजण धन्यता अनुभवितात. कारण राम दैवी संस्कृतीचा संरक्षक होता व दैवी संपत्तीच्या गुणांनी युक्त होता. आसुरी संस्कृतीचा नाश करणारालाच भारत खांद्यावर घेऊन नाचतो आणि त्यालाच सर्व जनतेने स्वतःच्या हृदयात चिरंतन स्थान दिले आहे; हे आज सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे.
        रामाच्या जीवनात प्रतीत होणारी दैवी तेजस्विता व सांस्कृतिक अस्मिता रामाला मिळालेल्या दिव्य शिक्षणाची आभारी आहे. विश्वामित्र रामाला घेऊन गेले होते यज्ञाच्या रक्षणासाठी; पण तेथे ते रामाला वेगळयाच पद्धतीने शिक्षण देत होते. रामाबरोबर गोष्टी व चर्चा करता करता त्यांनी रामाला जीवनाचे शिक्षण दिले. रामाला कळले देखील नाही की आपण काय शिकत आहोत. विश्वामित्रांनाही कधी वाटले नाही की, आपण काही शिकवीत आहोत. असे विश्वामित्र रोज रामाच्या जीवन ज्योतीला प्रेमाचे तेल पूर्वीत होते. एक अंतकरण दुसऱ्या अंतकरणाशी बोलते तसे विश्वामित्र हृदय मोकळे करून रामाशी बोलत होते.
       रामाच्या जीवनात असलेल्या सदगुणांनाही आजच्या दिवशी समजून घेतले पाहिजे. ज्याला राम होण्याची इच्छा आह- ज्याला नराचा नारायण व्हायचे आहे. त्याने रामाचा एक एक गुण घेतला अथवा आत्मसात केला तर तो खरोखर एक दिवस 'रामो भूतवा राम यजेत्'; राम होऊन रामाची पूजा करील.
  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन