शिवनिर्माल्य
![]() |
| शिवमहिम्नस्तोत्र |
शिवनिर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तीहीन बनतो. पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजाणतेपणी शिवनिर्माल्य ओलांडून जातो. त्यामुळे त्याची अदृष्ट होण्याची शक्ती नाश पावते. शक्तीहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो; तेच आपले 'शिवमहिम्नस्तोत्र'. त्याने त्याची शक्ती परत येते. आपणही शिवनिर्माल्य ओलांडले जाऊ नये म्हणून शिवमंदिरात संपूर्ण प्रदक्षिणा करीत नाही. ह्या गोष्टीच्या पाठीमागे असलेले रहस्य देखील समजण्याजोगे आहे. जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवनिर्माल्य समजले जाते, तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे हे शिवनिर्माल्याचे उल्लंघन गणले जाते आणि असले पाप करणारा कितीही शक्तिशाली असला तरीही थोड्याच वेळात शक्तीहीन बनतो. म्हणून वाहिलेले वित्त, प्रभू साठी चालत असलेले कार्य किंवा प्रभुला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे. अशा कर्माची किंवा माणसाची जिथे अवगणना होते त्या समाजात दुष्काळ, मृत्यू व भय यांचे साम्राज्य पसरते असे शास्त्र वचन आहे.
ज्यांच्या मस्तकातून ज्ञानगंगा वाहते, चारित्र्याच्या उत्तुंग व धवल शिखरावर जे बसले आहेत, साधेपणा हाच ज्याचा शृंगार आहे, जे विभूतीला वैभव समजतात, सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा संहार हे ज्यांचे जीवन व्रत आहे; काम नाही, तर प्रेम हा ज्यांचा आराध्य देव आहे, कर्मयोगी अशा बालेन्दूला ज्यांनी मस्तकावर धारण केले आहे, जगाच्या रक्षणासाठी ज्यांनी हसतमुखाने वीष प्राशन केले आहे, तसेच जे कल्याण व ज्ञान यांची साक्षात मूर्ति आहे अशा भगवान शंकराला आनंत प्रणाम

Comments
Post a Comment