महाशिवरात्रीच्या शुभेच्छा - महाशिवरात्री का साजरी केली जाते ?
शिव आहे सत्य, शिव आहे अनंतशिव आहे अनादी, शिव भगवंत आहेशिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्मशिव आहे शक्ती, शिव आहे भक्तीचला शंकराचे करूया नमनराहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायममहाशिवरात्रीच्या शुभेच्छा
भगवान शंकर सर्पांना स्वतःच्या शरीरावर खेळवतात. सर्प विष याचे प्रतिक आहे. विषारी दात पाडून टाकलेला सर्प जसा हानिकारक नाही तसे निर्वीष विष देखील नुकसानकारक नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर हे विकार जाणारे नाहीत. त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले तर ते बाधक होत नाहीत. त्यांच्याशी सहजपणे खेळू शकतो. शिवाय सापासारख्या जहरी माणसाकडूनही चांगले काम करून घेण्याच्या ज्ञानी पुरुषाच्या कुशलतेचे देखील येथे दर्शन होते. जगात जहरी समजली जाणारी ही माणसे महापुरुषाजवळ निर्विष व कार्यसाधक बनून राहतात.
भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात. शिवाचे-कल्याणाचे काम करू इच्छिणाऱ्या मानवाने सतत विष पिण्याची, कडू घोट पचविण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. समुद्र-मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्यायले, परंतु विष निघताच सर्वजण पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव पण विषपान करतो तो महादेव! याप्रमाणे भगवान शंकर त्या दिवसापासून देवांचे देव असे महादेव गणले गेले.
शंकर ही ज्ञानाची देवता आहे. ज्ञानवंताला दुसऱ्याचा दोष तत्काळ दिसतो. विद्वान तोच की, जो दुसऱ्याचा दोष ओळखू शकतो. परंतु त्याच बरोबर विषरूप अशा त्या दोषाला गळ्यात बाळगण्याची हिम्मत असेल तरच तो ज्ञानी, महापुरुष गणला जाईल. दुसऱ्याचे दोष आपल्यात आणता कामा नये तसेच ते बाहेर जराही जाहीर होता कामा नयेत, म्हणून त्यांचे योग्य स्थान आहे गळा. नीलकंठ भगवान ही गोष्ट देखील समजवतात.
भगवान शंकरांनी बीजेची चंद्रकोर मस्तकावर धारण केली आहे. दुसऱ्याच्या गुणांना याप्रमाणे मस्तकावर धारण करण्याची हिम्मत ज्ञानवंताला महान बनवते. शिवाय बिजेचा चंद्र हे कर्मयोग्याचे प्रतिक आहे. भगवान खऱ्या कर्मयोगालाच मस्तकावर धारण करतो ह्या गोष्टीचे हे द्योतक आहे.
शिव मंदिरात प्रवेश करताना प्रथम नंदीला व कासवाला नमस्कार करायचा असतो. नंदी शिवाचा वाहक आहे. त्याप्रमाणे आपणही खऱ्या ज्ञानाचे वाहक बनलो तर नंदीप्रमाणे आपली ही जगात पूजा होईल. भगवंताचे काम करणारा बैलही पूजीला जातो. बैलाला बुद्धी कमी असते, असे आपण समजतो परंतु भगवंताला किंवा भागवद्ज्ञानाला डोक्यावरून घेऊन गेला तर ह्या सामान्य बुद्धीचा बैलही भलभल्या विद्वानांचे तेजही फिके पाडील. प्रभूचा तो नंदी बनला, पण पूजिला गेला. एवढी साधी गोष्ट आपल्याला समजली तर किती चांगले होईल?
कुर्म म्हणजे कासव तो इंद्रिय निग्रह व संयम यांचे प्रतीक आहे. शिवाजवळ जायचे असेल तर जीवन संयमी असले पाहिजे. इंद्रियांचा गुलाम ज्ञान प्राप्त करू शकत नाही किंवा शिवापर्यंत पोहोचू शकत नाही.
इंद्रियाराम नाही तर आत्मारामच शिवा पर्यंत पोहोचू शकतो ही गोष्ट कासव आपल्याला समजावते. कासव हे संथ पण सतत साधणेचे प्रतीक आहे. मानवाने शिव बनण्याची प्रार्थना करताना होत असलेल्या प्रहारापासून बचाव करण्यासाठी कासवाच्या पाठीसारखी भक्तीची मजबूत ढाल धारण केली पाहिजे.
भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते. भगवंतावरील आपला अभिषेक सतत चालू राहिला पाहिजे.

Comments
Post a Comment