भगवंताची जागा कुठे असावी ?
हृदयस्थ भगवंत
आज आपण भगवंतावर प्रेम करतो. पण ते सापेक्ष प्रेम आहे. आपल्याला काही ना काही पाहिजे आणि ते भगवंताकडून मिळेल असे वाटते म्हणून आपले भगवंतावर प्रेम आहे. त्याच्यापुढे जाऊन, बुद्धी चालवली तर भगवंताबद्दल कदर भावना निर्माण होते, नी प्रेम सुरू होते. त्या स्थितीच्याही पुढे गेल्यावर ऐक्य पूर्ण गुढ अशरीरी प्रेम सुरू होते. गीतेचा हाच पुरुषार्थ आहे. जोपर्यंत ज्ञानासाठी आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत व्यक्ती वा समाज सुधारणे अशक्य आहे. मला माझ्या भगवंताला जाब द्यावा लागणार आहे. माझ्यासोबत माझा भगवान आहे. ही प्रथम समज आली पाहिजे. त्याच्या योगे माणसाचा आत्मसन्मान वाढेल.
मी कोण आहे? माझ्यापाशी काय आहे? माझ्यापाशी वित्त नाही, माझ्यापाशी बुद्धी नाही, माझ्यापाशी खुर्ची नाही तर मग माझी काय किंमत? अरे तुझ्यासोबत विश्व चालवणारा आहे; हे ध्यानात आले तर तुझ्या डोळ्यात चमक येईल, तेज येईल. आज सगळ्यांना पिडीत, गरीब, बिचारे म्हणून त्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण वास्तविक त्याच्यामुळे ते अजून खालीच घसरतात. 'तुझ्याकडे पैसा नाही. शिक्षण नाही. बुद्धी नाही.' असे त्यांना सांगून सांगून त्यांच्यातल्या कमतरतेचेच भान त्यांना करून दिले जाते. 'तुझ्यासोबत विश्वंभर आहे. तुझ्यात शक्ती आहे.' असले काही दर्शन घडवले जात नाही. माझ्यापाशी काही आहे, मी कुणी आहे ही गोष्ट समजण्यासाठी बुद्धी पूर्वक भगवंताला मानले पाहिजे. भगवंत माझ्यासोबत आहे हे बुद्धीने समजून घेतले पाहिजे. म्हणूनच बुद्धी पूजा म्हणून कपाळावर चंदनाचा टिळा लावतात.
Comments
Post a Comment