महाशिवरात्र एका पौराणिक कथेत.
माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी येणारे शिवरात्रीचे व्रत मानवाला शिव बनण्याचे प्रेरणा देते. सकल सृष्टीला ते शिवत्वाचा संदेश देते. शुभ चिंतन व सतत जागृतीपूर्वक ह्या व्रताचे पालन करण्यात आले, तर एकाच रात्रीत माणूस शिवत्व प्राप्त करू शकतो, ही निसंशय गोष्ट आहे.
शिवरात्रीच्या दिवशी एका पारध्याच्या झालेल्या हृदय परिवर्तनाची पौराणिक कथा तर आपल्याला माहीतच आहे. हरिणांच्या वचनावर विश्वास ठेवून तो त्यांना त्यांच्या पाडसांना भेटायला जाण्याची परवानगी देतो. हरणाची वाट पाहत बसलेला शिकारी संपूर्ण रात्र बिल्लव वृक्षावर बसून राहतो. संपूर्ण दिवसाचा उपवास, रात्रभराचे जागरण, आणि बिल्लवपत्र तोडून तोडून खाली फेकीत असल्यामुळे झाडाखाली असलेल्या शिवलिंगाचे अनायासे झालेले पूजन या सर्व गोष्टी त्याची एक विशिष्ट मनोभूमिका निर्माण करतात. त्यात सकाळ होताच हरणांना सहकुटुंब परत आलेले पाहून त्याचे हृदय विरघळते. हरणांचे वचन पालन व वात्सल्य त्याच्या हृदयाला द्रवित करते. दोन पायाचा मानव चार पायाच्या प्राण्यांना त्यांच्या महानतेबद्दल भाव-पूर्वक नमस्कार करतो. हे वात्सल्य व वचन पूर्तता पारध्याचे हृदय परिवर्तन करते व त्याच्यातही शिवत्व निर्माण होते.
' शिवो भूत्वा शिवं यजेत् |' शिव बनून शिवाची उपासना केली पाहिजे. शिव बनण्याचे प्रेरणा शिव-दर्शनातूनच सापडते. शिव ही ज्ञानाचे देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत राहिलेली आहे. ज्ञानराणा शंकराची उपासना करू इच्छिणारा मानवही ज्ञानपीपासू असला पाहिजे. गंगा जशी शंकराच्या जटेतून निघते त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या विशुद्ध बुद्धीत जीवनाच्या कठीण समस्यातून आरपार जाण्याची हिम्मत असली पाहिजे. खऱ्या ज्ञानासमोर कोणतीच समस्या टिकत नाही. खऱ्या ज्ञानवंताला कितीही कठीण प्रश्न असला तरी त्याचे उत्तर त्याला सहज साध्य होत असते.
Comments
Post a Comment