नीलकंठ
भगवान शंकर दिगंबर आहे. अर्थात त्यांनी दिशाचे वस्त्र धारण केले आहे. समग्र सृष्टीला व्यापूनही जो शेष राहतो अशा या परमात्म तत्वाला कोण आवृत्त करू शकतो? त्याला आच्छादित करायला सर्वच वस्त्रे अपुरी आहेत. तसेच समग्र विश्वाला अच्छादित करणाऱ्या तत्त्वाला आच्छादनाची गरज नाही.
ज्ञानी पुरुषाने विभुतेला वैभव समजण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. ते सुचविण्यासाठी भगवान शंकर स्वतःच्या शरीरावर भस्माचे लेपन करतात. ते भस्म देखील सामान्य मानवाचे नाही. महापुरुषाच्या मृत्यूनंतर त्याचे भस्म भगवान शंकर कपाळाला लावतात. तसेच अशा प्रभूनिष्ठ लोकांच्या कवटीचा हार बनवून शंकर स्वतःच्या गळ्यात धारण करतात आणि म्हणूनच त्यांना 'कपाली' म्हणतात.
'ज्यांच्या डोक्यात सतत शिव-विचारच चाललेले असतात अशा लोकांच्या कवटीचे हार भगवान धारण करतात. एवढेच नाही तर भगवान स्वतःच सतत ह्या महापुरुषांचा विचार करीत असतात. जगातील दुसऱ्या लोकांना ही गोष्ट कळू नये म्हणून स्वतःच्या डोक्यात चाललेले विचार लपविण्यासाठी तर भगवान शंकरांनी जटाधारण केलेले नाही ना?'
भगवान शंकराच्या हातात असलेला त्रीशूळ सज्जनांना आश्वासन देतो व दुर्जनांना भयग्रस्त बनवतो. सज्जनांच्या रक्षणासाठी शिव सदोदित जागृत आहेत. तसेच दुर्जनांच्या हिंसेसाठी ते नेहमी कटीबद्ध आहेत. शंकर भोळे नाही तर भोलानाथ आहे. म्हणून दुर्जनांची लबाडी ते तत्काळ ओळखतात. जगात असलेल्या स्वतःच्या भोळ्या भक्तांचे ते दुष्टापासून रक्षण करतात. ईश्वराचे अस्तित्व न स्वीकारणाराचे सत्कार्य देखील भगवंताला मान्य नाही, हे दाखविण्यासाठी शंकराने दक्ष-प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला.
संहारक-देवता अशा शंकराच्या हातात त्रिशूळ शोभतो, परंतु त्यांच्या हातात असलेले डमरू आश्चर्य निर्माण करते. डमरू संगीताचे प्रतीक आहे. संस्कृतात 'संहार' याचा अर्थ शृंगार अथवा सजावट असाही होतो. सर्जन व विसर्जन, दोहोंच्या सहयोगाने सृष्टीची सजावट सुंदर वाटते. शिवाय डमरू हे ज्ञानाचे उद्गाता आहे. महर्षी पाणीनीला त्याच्या व्याकरणाचे बीजमंत्र डमरूच्या आवाजातून सापडले होते, अशी दंतकथा आहे. भगवान शंकरांनी त्याच्या कानाजवळ डमरू वाजून हे ज्ञान त्याला दिले होते. सृष्टीतील अशी कितीतरी रहस्य भगवान सृष्टी-शोधकांच्या कानाजवळ डमरू वाजून त्यांना सांगत असतील. जगातील अधिकाधिक शोध ईशकृपेनेच मानवाला लागलेले आहेत, परंतु आजच्या मानवाजवळ ईशकृपेची ही खरी गोष्ट कबूल करण्यासाठी प्रामाणिकता नाही.

Comments
Post a Comment