होळीची कथा -हिरण्यकश्यपू आणि मुलगा फक्त प्रल्हाद यांच्यावर आधारित
होळीची कथा
होळीच्या उत्सवामागे असलेली कथा देखील फारच प्रसिद्ध आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसत होते. भोगच त्याच्या जिवनाचा प्रधान भाग होता. राक्षस म्हणजे खा, प्या, मजा करा अशा मनोवृत्तीचा मानव. भोगाशिवाय हालत नाही व स्वार्थाशिवाय पाऊल उचलत नाही. त्याच्या राज्यात ही त्याने सर्वांना खायला भाकरी व राहायला घर मिळावे एवढेच पाहण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या भाव- जीवनाकडे त्यांनी निरंतर दुर्लक्ष केले. स्वतःलाच ईश्वर समजणारा तो दुसरा ईश्वर कोठून स्वीकारणार?
चिखलात कमळ, तसा त्याच्या घरात भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली होती. तेथील संस्काराचा परिणाम प्रलादावर झाला होता. प्रल्हादाचे अंतकरण भगवद्भक्तीने भरलेले होते. त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचा अनेक प्रयत्न केले पण निष्ठावान बालकाला बदलण्यात ते असमर्थ ठरले. त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रल्हादाचा ईश्वरवाद जर सर्वत्र पसरला तर भोगवादावर उभ्या असलेल्या आपल्या राज्याची मुळेच ढिल्ली होतील, असे त्यांना वाटले. असुरी वृत्तीचा बाप मुलाच्या असल्या गोष्टी कसा चालून घेईल? प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून देणे. प्रल्हाद अग्नीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसविला. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला वरदान होते की तिने जर सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. स्वतःच्या बंधूंच्या आग्रहाला वश होऊन होलीकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायचे कबूल केले. परिणाम जो व्हायचा तोच झाला. होलीका जळून भस्म झाली; तर सद्वृतीचा ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला. प्रल्हाद लहान होता. जगातही सद् वृतीचे लोक अल्पसंख्यांक असतात, पण जर ते सन्निष्ठ असतील, प्रभुनिष्ठ असतील, तसेच तपस्वी व क्रियाशील असतील तर व्यापक असलेली असत् वृत्तीही त्यांना ग्रासू शकत नाही. असा अनुपम संदेश होळीचा उत्सव आपल्याला देतो
Comments
Post a Comment