ओंकार - प्रत्येक मंत्रात दडलेला शब्द
ओंकार
सर्व मंत्रामध्ये ओंकार उत्तम रीतीने ख्याती पावलेला आहे. ओंकाररुपी होडीनेच संसार सागर तरू शकू.
जगामध्ये जन्म घेणारा प्राणीमात्र मर्त्य आहे. मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवाने वेदत्रयीचा आश्रय घेतला आहे. देव वेदांच्या गुहेत लपले म्हणून वेदांना छंदस्य असे संज्ञा प्राप्त झाली. परंतु तेथेही मृत्युने देवाचा पिच्छा केला. तेव्हा देवानी ओंकाराचा आश्रय घेतला. ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले दुर्गम व अभेद्य स्थान. तेथे मृत्यूला प्रवेश मिळाला नाही. देव अमर झाले. ओंकाराचे हे सामर्थ्य ध्यानात घेऊन उपनिषदांच्या ऋषींनी माणसाला सल्ला दिला की ज्याला मृत्यूच्या भयापासून सुटायचे असेल त्याने ओंकाराचे उपासना करावी. ओंकाराचा महिमा उद्घोषित करणारी ही अख्यायिका छांदोग्य उपनिषदात सांगण्यात आलेली आहे. ओंकार म्हणजे उपनिषदाचे सार. ओंकार विद्या ही अक्षर विद्या आहे. अक्षर म्हणजे अविनाशी व अविनाशी म्हणजे परब्रम्ह. ओमित्येकाक्षरं ब्रह्म या शब्दांनी भगवंताने त्याचा महिमा वर्णन केला आहे.
वेदांच्या उपासनेपासून फार फार तर स्वर्ग मिळेल. पण ओंकाराच्या उपासनेपासून साक्षात अमृततत्त्वाचे प्राप्ती होते. ओंकाराचे प्रणव व उदगीथ अशी दुसरी दोन नावे आहेत. नु धातूचा अर्थ आहे स्तुती करणे. या धातूला उपसर्ग लावून प्रणव शब्दाला बनला आहे. त्याचा अर्थ प्रकर्षरीत्या केलेली स्तुती किंवा उत्तम स्तोत्र असं होऊ शकतो. उत्तम स्तोत्र परब्रम्हाची स्तुतीच असते. परब्रम्हाची स्तुती करताना सर्वच वाङ्मय अपुरे असल्याचे सिद्ध होते. तेथे शब्द चापल्य कामाला येत नाही.
ओंकाराचे दुसरे नाव उदगीथ आहे. गै धातूचा अर्थ आहे गाणे. त्याला उत् उपसर्ग लावून हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ देखील उच्च गीत किंवा उत्तम स्तुती असाच होतो. शब्द जेथे पोहोचत नाहीत अशा त्या परब्रम्हाचे उत्तम स्तवन करण्याच्या हेतूने ऋषींनी सर्व संकेत ज्याच्या साडेतीन मात्रांमध्ये सामावले जातील अशा ओंकाराचा प्रयोग केला.
छांदोग्य उपनिषदात अशीच एक दुसरी कथा आहे. देव व दानव यांच्यात झालेल्या संग्रामात आसुरांचा पराभव करण्यासाठी देवाने उदगीथचा आश्रय घेतला. स्पष्ट अर्थ ध्यानात न आसल्यामुळे त्यांनी श्र्वासोच्छवास, वाणी, डोळे, कान, मन वगैरे यांची अनुक्रमाने उदगीथ समजून उपासना केली. पण त्यात त्यांचे जमले नाही. असुरांनी इंद्रियांवर पापाचा मारा करताच नाक सुगंधा बरोबर दुर्गंधही घेऊ लागले. डोळे शुभ बरोबर अशुभाही पाहू लागले कान न ऐकायचं तेही ऐकू लागले. वाणी सत्या बरोबर असत्यही बोलू लागली. आणि मन संकल्प विकल्पात भटकू लागले.
Comments
Post a Comment