श्रेष्ठ जीवनाचे पैलू - सत्यं, शिवं, सुंदरम्
भक्तीत सुंदरता आहे. त्यांची भक्ती लाचारीतून उभी राहत नाही. आकर्मण्य भक्तीला दुर्गंध येतो. भक्तीत सुगंध आला पाहिजे. सौंदर्य व्यक्तीनिष्ठ असते. जी सुंदर वस्तू किंवा विषय असतो, त्याचा आस्वाद घेणारा त्याहून भिन्न असतो. तो स्वतःच्या कल्पनेनुसार वस्तूकडे बघतो. म्हणून सौंदर्य वस्तुनिष्ठ मानले जात नाही. तर सौंदर्य व्यक्तीनिष्ठ किंवा आत्मलक्षी असते. आपल्या डोक्यात सौंदर्याची कल्पना असते तीच घेऊन आपण चित्र पाहतो. सौंदर्य वस्तुगत असत नाही. त्यामुळे त्याची व्याख्या करणं केवळ मुश्कील नाही तर महाकठीण आहे. जे आत्मलक्षी असतो त्याची व्याख्या कशी करणार? त्याची व्याख्या होऊ शकत नाही.
आता वस्तुत असलेले जे आकर्षण सामर्थ्य आहे ते ज्याला आकर्षक वाटेल त्याला ती वस्तू सुंदर वाटेल, तीच त्याची सुंदरता होय. म्हणून असे म्हणू शकतो की सौंदर्य वस्तू गत आहे. पण अनुभूती व्यक्तिगत आहे. वस्तूसौंदर्य आणि व्यक्तिरसिकता यांचा मेळ म्हणजे सुंदरता.
सहचार्यामुळे सौंदर्य येते. परंतु सुंदरतेसाठी सहचार्य अपेक्षित आहे का याचा विचार करायला हवा. निसर्गामध्ये सौंदर्य आहे पण सहचाऱ्यामुळे सुंदरता निघून जाते. कोणी भगवंतापाशी सतत बसला तर तो सुंदर वाटेल? सहचार्यामुळे सौंदर्य खलास होते. कमी होते. नायजरा धबधबा अतिसुंदर आहे पण तिथे राहणाऱ्या लोकांना त्यात सौंदर्य वाटतच नाही. कारण तो रोजचा झालाय. गंगा किनारी राहणारे लोक विहिरीच्या पाण्याने स्नान करतात. पत्नी सुंदर असली तरी सहचार्यामुळे तिचे सौंदर्य कमी वाटू लागते. व्यक्तीच्या जीवनातील सौंदर्य आत्मलक्षी असल्याने ते भगवंताला सुंदर वाटले पाहिजे. ही पहिली गोष्ट. भोग आणि सौंदर्य एकत्र असत नाही. ज्या सौंदर्यात स्वार्थ निरपेक्षता आणि भोगशून्यता असते. त्यालाच खरे सौंदर्य म्हणतात. भोग आला की सुंदरता गेली समजा, माणसाने गुलाबाचे फुल पाहिले, ते घेऊन बटन हॉलमध्ये लावण्याची त्याने इच्छा केली. म्हणजे त्यात मालकीची भावना आली की सौंदर्यवादी नजर निघून जाते. सुंदरतेसाठी स्वार्थ निरपेक्ष आणि भोगशून्य नजर असली पाहिजे. उपभोगासाठी जे सुंदर वाटते ते उपयोगाच्या असक्ती मुळे सुंदर वाटते. आपण हा विचार करायचा आहे की आपल्याला जीवनात जे सौंदर्य उभे करायचे आहे ते अनुपभोगी शक्तीला सुंदर वाटले पाहिजे. आपली वृत्ती, आपली बुद्धी, आपली मान, आपले जीवन भगवंताला सुंदर वाटले पाहिजे. सुंदरता वस्तूनिष्ट नाही तर व्यक्तीनिष्ठ आहे.
सौंदर्याच्या वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत. पुरुषोत्तम पर्यंत जाणारे लोक भगवंताचे चित्र आहेत आणि भगवंताची कविता आहेत. ती भगवंतांनी गायलेली कविता आहे. कविता आणि चित्राच्या सौंदर्याच्या संदर्भात हे जे निरूपण आहे ते स्वीकारले पाहिजे. जशी कविता आणि चित्र सुंदर वाटते तशीच भगवंताची कविता आणि भगवंताचे चित्र सुंदर वाटते.

Comments
Post a Comment