भक्तीप्रधान - भक्तीप्रधान संस्कृती ही कलियुगाची गरज.
भक्तीप्रधान
भक्तीप्रधान समाज असला पाहिजे आणि भक्तीप्रधान अर्थ रचना असली पाहिजे. एवढेच नाही तर अर्थाचे वितरणही भक्ती प्रधान असले पाहिजे. आज तर भक्तीचा अर्थ मंदिर, टाळ- चिपळ्या, भजन आणि प्रसाद, आरती यातच सीमित झाला आहे.आज लोक म्हणतात की जाती-जातीमध्ये वैमनस्य आहे. म्हणून ते काढायचा एकच रस्ता आहे तो म्हणजे भक्ती! भक्ती द्वारे संप्रदाय राखूनही एकता उभी होईल. मुसलमान, मुसलमान राहू शकतो. पारशी, पारशी राहू शकतो. हिंदू, हिंदू राहू शकतो. आणि तरीही ते एक आहेत. जीवनाला काही वळण हवे त्यासाठी आईच्या मांडीवर बसून काही सिद्धांत जीवनात उतरवले पाहिजेत. वेगवेगळे संप्रदाय उभे झाले असले तरी त्याचे पायाभूत सिद्धांत एक आहेत. जीवनात भक्ती प्रधानता आली पाहिजे, वित्तात आणि देण्यातही भक्ती प्रधानता आली पाहिजे. त्यासाठी तर ऋषींनी मंदिर उभे केले. मंदिरे सामाजिक आर्थिक केंद्र होती. आज असत विचारांचा जबरदस्त प्रभाव आहे. पण म्हणून काही सत् विचारांच्या निर्झराने मरायचे नाही. त्या निर्झराने दाखवून द्यायचे आहे की पाणी इथेच मिळेल, दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. चांगले निर्मळ पाणी इथेच आहे, असे लोकांना कळले पाहिजे, मग लोक निर्मळ पाणी शोधत तिथे येतील. तुम्ही कधी दर्या डोंगरात फिरायला गेलात? गेला असेल तर तुम्हाला ठाऊक असेल की लोक विचारतात, निर्झर कुठे आहे? निर्झर सापडल्यावर लोक स्वच्छ आणि निर्मळ जल मिळवण्यासाठी तिथे येतात. सत् विचारामुळेच इच्छित सामाजिक परिणाम मिळतात.
Comments
Post a Comment