भक्तीप्रधान धर्म - विषमता मिटवण्याचा महापुरुषांचा प्रयत्न
विषमता मिटवण्याचा महापुरुषांचा प्रयत्न
सामाजिक अन्याय आणि आर्थिक भेद, आर्थिक विषमता मिटवण्यासाठी मनू महाराजांनी लेखन केले आहे, काम केले आहे. याज्ञवल्क्य यांनीही त्यासाठी काम केले आहे. याज्ञवल्क्य सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते नव्हते, परंतु त्यांची भाषा ऐकल्यावर ते तसे असतील असा गैरसमज तयार होतो. वास्तविक हे महापुरुष किती महान होते! त्यांनी असे काम कशासाठी केले? समाजातून, सामाजिक आणि आर्थिक विषमता गेली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यांच्या जीवनाद्वारा, त्यांच्या विचाराद्वारा, त्यांच्या अस्तित्वाद्वारा समाजात परिणाम होतो.
आपल्याला कोणीतरी निर्माण केले आहे, पण हा हिंदूधर्माचा, हा इस्लामधर्माचा, हा ख्रिस्तीधर्माचा असा शिक्का कोणी मारला? आपण जन्मलो तेव्हा शेंडी आणि जाणवे घेऊन थोडेच आलो होतो. तर मग आपण सामाजिक अन्याय आणि आर्थिक विषमता मिटवण्यासाठी विचार करायला नको? हे काम करण्यासाठी जो रात्रंदिवस काम करतो तो भगवंताला सुंदर वाटतो. गीतेत भगवान धर्मसंस्थापनार्थाय संभवानी युगे युगे असे म्हणतो. हा धर्म कोणता?
भक्तीप्रधान धर्म. भक्तीप्रधान धर्म कोणातही भेदभाव उभा करत नाही. कर्मकांडात्मक धर्म परस्परांना वेगळा करतो आणि असा धर्म जेव्हा प्रभावी होतो त्यावेळी जे भक्ती प्रधानधर्म पुन्हा उभा करण्याचे काम करतात ते भगवंताच्या दृष्टीने सुंदर आहेत.
आपण जन्मलो तेव्हा शेंडी किंवा जानवे घेऊन आलो नव्हतो. जानवे दिले आणि नंतर सांगण्यात आले की तू या ग्रुपचा आहेस. तर मग असे ग्रुप असू नयेत काय? धर्म असू नये? संप्रदाय असू नये? ते असलेच पाहिजेत, कारण ते आईसारखे आहेत. तेच जीवनाला वळण देऊ शकतात. जीवनाला वळण मिळाले पाहिजे, नैतिक वळण मिळाले पाहिजे, सांस्कृतिक वळण मिळाले पाहिजे. त्यानंतरच तो जीव आध्यात्मिक बनेल. एवढ्यासाठी सामाजिक अन्याय आणि आर्थिक असमानता काढायचा प्रयत्न ऋषी करतात.

Comments
Post a Comment