सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 7. काहीही सुंदर आहे जिथे सत्य, निसर्ग, आदर्श आणि विश्वाची आत्मा प्रकट आहे.
7. Anything is beautiful which reveals truth, the spirit of nature, ideal and universe.
या एकाच व्याख्येत चार प्रकार येऊन जातात. ते सुंदर आहे की ज्यामध्ये सत्याचे, निसर्गतत्त्वाचे, आदर्शतत्वाचे, तसेच सामान्याचे दर्शन घडते.
ते सुंदर आहे, ज्यातून सत्याचे दर्शन होते. सत्यासाठी कवीने पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. मी आणि विश्व वेगळा आहे. ज्याचे सर्व आहे, त्याला जो मानतो आणि स्वतःची शक्ती, वैभव यांचा त्याच्यासाठी उपयोग करतो तो सच्चा आहे. तो सत्याचा अविष्कार आहे. सत्य आणि सुंदरता एकत्र नांदत नाहीत. जीवनात विरूपतेचाही एक भाग आहे, तो काय सुंदर होऊ शकतो?. तरीही ती वास्तविकता आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये क्रोध आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ती विरुपता आहे, जी सत्य आहे पण सुंदर नाही. क्रोध सत्य आहे पण सुंदर नाही. म्हणून तो सुंदरतेचा भाग नाही होऊ शकत. सत्य आणि सौंदर्य एकत्र नांदतात की नाही? हा एक प्रश्न आहे. सत्य सर्वथा सुंदरच असेल असे नाही. द्वेष सत्य आहे पण सुंदर नाही. सगळे सुंदर सत्यच असेल असेही नाही. जीवनात द्वेष आहे, मत्सर आहे ही वास्तविकता आहे- सत्य आहे पण ते सुंदर तत्व नाही. सत्य सुंदरच आहे असे लोक मानत नाही. जे दिसायला सुंदर असेल ते सुंदरच आहे असे नाही. जो स्व-रूपतेचा भाग असेल त्यात सौंदर्य जाणवणारच. विरूपता देखील जर त्याच्यासाठी ( भगवंतासाठी ) वापरली असेल तर? देवा! मी माझ्यासाठी कोणावर क्रोध केला नाही, तुझ्यासाठी केला, संस्कृतीसाठी केला, जसा भगवान रामचंद्रांनी रावणावर केला होता .आणि तरीही शेवटी बिभीषणाला म्हटले की, तू रावणाची अंतक्रिया करायला तयार नाही झालास तर मी त्याची अंतक्रिया करीन .
तुझे आणि रावणाचे संबंध आहेत तसे माझे आणि रावणाचे देखील सबंध आहेत. तु त्याची अंतक्रिया केली नाहीस तर मी करीन. सांगायचे तात्पर्य हे की ज्याने क्रोध, मत्सर, द्वेष यासारखी वीरूपता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली नाही, तर भगवंतासाठी वापरली तो सुंदर आहे. त्यामुळे वीरूपता पण सुंदर होऊन जाते. सत्य सिद्धांताचे दर्शन करवणे, प्रेरणा देणे, जीवनाचे सत्यस्वरूप आणि भगवंताचे सत्यस्वरूप समजावणे ही सुंदरता आहे.हे सगळे पंगू मन करू शकत नाही. म्हणून भगवंत गीतेत म्हणतो.
माय्यासक्त मना: पार्थ योगं युज्जन्मदाश्रय| असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तुच्छृणु||
भगवंत म्हणतो की असंशयं समग्रं माम्... म्हणजे जो समग्र रित्या जाणतो; त्यातही परिपूर्णता आहे. माणसाचे मन दुर्बळ असेल, पंगु असेल तर ना जीवन समजू शकणार ना भगवंताला समजू शकणार. मनाचे पंगत्व काढणारा सुंदर आहे.
जीवनात निसर्गतत्त्वाचे दर्शन झाले पाहिजे. विषयाकडे धावणे हा निसर्ग नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तो सोडणे हा निसर्ग आहे. सगळे विषय सोडण्यासाठी शिक्षण असत नाही, तर सगळे विषय उचलण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी शिक्षण असते. रात्री व्यक्ती झोपली की त्यावेळी ती लहान मूल असो, तरुण असो किंवा म्हातारा असो, तिचे सगळे विषय सुटले. विषय खलास! विषय सोडण्यासाठी शिक्षणाची जरूर नाही. जे नैसर्गिक असते, त्याच्यासाठी शिक्षण असते. लहान मूल जन्माला आल्यावर त्याला, 'तू सर्व सोडून दे, तू काही बघू नकोस, कोणतीही वस्तू तुझ्या मनात येता कामा नये'. हे त्याला कोणी शिकवले? ते नैसर्गिक आहे. आधी सांगितले त्याप्रमाणे विशायाकडील धाव ही नैसर्गिक नाही. विषय सोडणे हे नैसर्गिक आहे. मी हे बोलतोय ते कदाचित विक्षिप्त वाटेल. परंतु विषय सोडून देण्याचे शिक्षण कोणी कोणाला देत नाही. आपण रोज विषय सोडतो. परिस्थितीमुळे, लोकांमध्ये राहिल्यामुळे विषयाकडे धावायचे शिक्षण मिळते, विषयापासून पळण्याचे शिक्षण मिळत नसते, ते नैसर्गिक असते. म्हणूनच विषयांना पकडून बसणे हे नैसर्गिक नाही.
माणसे विषय सोडतात, पण कधी? थकल्यावर! म्हातारी माणसे म्हणतात की विषयात काही अर्थ नाही. याचे कारण त्यांच्या इंद्रियांना थकवा आला आहे आणि म्हणून ते विषय सोडून देतात. हे सोडणे नव्हे. थकल्याने विषय सुटतात किंवा कंटाळल्यामुळे विषय सुटतात. महापुरुष थकलेले नाहीत, कंटाळलेले नाहीत तर त्यांनी विषयांचा विषयी पण सोडून दिलेला आहे.त्यांच्या बाबतीत वस्तू असली तरी विषय नसतो. तरुण मुलगी रस्त्यावरून जात असेल तर ती तरुणांसाठी विषय बनते. पण त्याचवेळी कुत्रा सुद्धा तिला बघतो पण त्याच्यासाठी ती युवती विषय नाही. अशा तऱ्हेने विषय वस्तूत नाहीत तर डोक्यात आहे. वस्तू वस्तूच आहे आपण वस्तूला विषय ठरवतो. समजा, आपण बगीच्यामध्ये फुल पाहिले. फुल फार सुंदर आहे. ते बघून त्याचा आनंद घेतला आणि त्याला नमस्कार करून निघून गेलो. हा विषय नाही. परंतु आपण फुल तोडून बटन होलमध्ये लावतो. तेव्हा तो विषय बनतो. याचा अर्थ विषयत्व वस्तूमध्ये नाही. डोक्यात आहे. डोक्यातून विषयत्व ज्याने काढले. आणि नैसर्गिक जीवन राखले. तो सौंदर्य उचलू शकतो. पाहू शकतो. समजू शकतो. आणि त्याचा आनंद घेऊ शकतो.

Comments
Post a Comment