मरण : भय की बोध? — भारतीय संस्कृतीतील विसंगती
मी आयुष्यात जे जे केलं असेल, त्याचं अंतकाळी स्मरण करून, पूर्ण हिमतीने मरणाला सामोरं जाण्याची तयारी—ही हिंमत केवळ भारतीय संस्कृतीत आढळते. शेवटी हसतमुखाने मृत्यूला सामोरं जाण्याचं धैर्य जर कुठे दिसत असेल, तर ते आपल्या परंपरेतच.
पण आज एक दुःखद विसंगती दिसते. भारतीय समाजाने मरणाभोवती इतकी अमंगलता, अपशकुन, भय आणि भयंकर कल्पनांचं जाळं विणलं आहे की, कदाचित इतर कोणत्याही संस्कृतीत इतकं आढळणार नाही. हे विशेष खटकतं, कारण मृत्यूविषयी अत्युच्च कोटीचं तत्त्वज्ञान आणि सूक्ष्म चिंतन जर कुणी केलं असेल, तर ते भारतीयांनीच.
आपल्या धर्मग्रंथांनी केवळ मृत्यूचं तत्त्वज्ञान मांडलेलं नाही, तर शोक किती दिवस करावा याचीही स्पष्ट मर्यादा आखलेली आहे. मनुस्मृती सांगते—जास्तीत जास्त दहा दिवस शोक करा; अकराव्या दिवशी शुद्ध व्हा, देवदर्शन घ्या आणि तेराव्या दिवशी पुन्हा जीवनाच्या प्रवाहात सामील व्हा. याहून अधिक शोक कशासाठी?
आई-वडील, गुरु, अतिशय निकटवर्ती व्यक्ती यांच्या निधनाने दीर्घकाळ मनात वेदना राहणं स्वाभाविक आहे. आठवणी येतात, डोळे भरून येतात—ते मानवी आहे. पण आज शोकाचा जो अतिरेक केला जातो, तो हास्यास्पदही आहे आणि अधार्मिकही.
कोणी म्हणतं, “आम्ही शोकात आहोत.”
कारण विचारलं तर उत्तर येतं—“माझ्या नणंदेच्या पुतण्याची बायको वारली.”
दुःख वाटलं असेल तर समाचाराला जा; पण महिनोन्महिने जीवन थांबवणं कशासाठी?
चैत्रात माणूस वारला, तरी दिवाळी आली की अजूनही शोकाचा देखावा—हा केवळ ढोंगीपणा आहे. घरात श्रीखंड खात बसायचं आणि बाहेर काळा चेहरा करून ‘शोक पाळतोय’ असं दाखवायचं—याला धर्म म्हणायचं का?
एकीकडे आपल्या देशात मृत्यूवर अत्यंत सखोल विचार झाला आहे; आणि दुसरीकडे मृत्यूचं भयही तितकंच खोलवर रुजलेलं आहे. या भयामुळेच आपल्या समाजात साहसाची कमतरता दिसते. परकीय लोकांनी हिमालय सर करण्याचे प्रयत्न केले; आपण मात्र ‘गेलो आणि मेलो तर?’ या भीतीत अडकून राहिलो. क्वचित कोणी हमाल म्हणून सोबत गेला असेल; पण स्वतःहून पुढे जाण्याची हिंमत फार कमी.
हा विरोधाभास थक्क करणारा आहे. ज्या देशात जीवन-मरणाचं एवढं प्रगल्भ तत्त्वज्ञान उभं राहिलं, त्याच देशातील लोक मृत्यूच्या बाबतीत इतकं अविवेकी कसं काय वागतात?
दुःखाची गोष्ट म्हणजे, हा सगळा अनाचार धर्माच्या आणि ऋषीमुनींच्या नावावर चालतो. प्रत्यक्षात धर्म स्पष्ट सांगतो—रडणं थांबवा, जीवन थांबवू नका. वडील वारले असतील तर त्यांचं स्मरण करा, तर्पण करा, आणि त्यांना अभिमान वाटेल असं ईश्वरकार्य करा. हीच खरी श्रद्धा आहे; उरलेलं सगळं केवळ भीतीचं प्रदर्शन.
मरण हा अपशकुन नाही; तो बोध आहे.
भय नाही; तो जीवनाची परिपूर्णता आहे.
Comments
Post a Comment