मूढतेचा झगा आणि विद्वत्तेचा अहं
माणूस विद्वान व्हायला फार कष्ट घेतो; पण मूढ व्हायला मात्र तो घाबरतो. कारण मूढता म्हणजे अज्ञान—असा आपला ठाम समज असतो. पण जीवनाच्या प्रवासात मूढता ही विद्वत्तेची शत्रू नाही; ती तिचीच पूरक अवस्था आहे.
विद्वत्ता माणसाला उंच नेते, पण अहंकार वाढवण्याचा धोका तिच्यात असतो. आणि अहंकार वाढला की माणूस ऐकणं बंद करतो. ज्या क्षणी “मला सगळं कळतं” असा भाव येतो, त्या क्षणी शिकण्याची दारं बंद होतात.
मूढता हा दार उघडण्याचा क्षण असतो.
लहान मूल सगळ्या जगाकडे कुतूहलाने पाहतं. ते मूढ असतं—पण ते मुक्त असतं. त्याला लाज नसते, भीती नसते, प्रतिष्ठेचा बोजा नसतो. म्हणूनच ते सहज शिकतं. विद्वान माणूस मात्र अनेकदा आपल्या ज्ञानाच्या ओझ्याखाली वाकलेला असतो.
वैदिक परंपरेत गुरु शिष्याला पहिल्यांदा विद्वान बनवत नाही; तो आधी त्याला शून्य करतो. “तुला जे माहीत आहे, ते विसर”—हा आदेश सोपा नाही. पण जो मूढ होऊ शकतो, तोच खरा शिष्य होऊ शकतो.
जीवनात असे अनेक क्षण येतात जिथे मूढतेचा झगा चढवावा लागतो.
एखादा तत्त्वज्ञ महानिबंध लिहितो; पण त्याच्यासमोर पाच वर्षांचं मूल आलं की त्याला आपली विद्वत्ता बाजूला ठेवावीच लागते. त्या मुलासोबत बसण्यासाठी, खेळण्यासाठी, हसायला—मूढ व्हावंच लागतं.
हे न जमल्यावर विद्वत्ता तुटक होते, कोरडी होते.
अहंकारयुक्त विद्वत्ता नेहमी उत्तरं देते.
मूढता मात्र प्रश्न विचारते.
आणि प्रश्न विचारणं हेच शिकण्याचं पहिलं पाऊल आहे.
श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना आधी त्याला मूढ ठरवतात—“क्लैब्यं मा स्म गमः पार्थ.”
हा अपमान नाही; हा जागृतीचा धक्का आहे. अर्जुन विद्वान होता, शूर होता; पण त्या क्षणी तो विवेकशून्य करुणेत अडकला होता. म्हणून त्याला मूढतेची जाणीव करून देणं आवश्यक होतं.
वसुरूपतेचा इथे खोल अर्थ समजतो.
आत्मा वसु: असतो, तेव्हा विद्वत्ता आणि मूढता—दोन्ही त्याच्या अधीन असतात.
अहंकार वसु: झाला की विद्वत्ता सत्ता बनते आणि मूढता पाप ठरते.
खरा साधक तोच, जो गरज असेल तेव्हा विद्वान होऊ शकतो आणि गरज असेल तेव्हा मूढही होऊ शकतो.
जो आपल्या विद्वत्तेचा उपयोग करतो, पण तिचा गर्व करत नाही.
जीवनात अनेक संघर्ष केवळ या कारणामुळे उभे राहतात की माणूस मूढ व्हायला तयार नसतो.
“मला माहीत आहे” ही भूमिका अनेक नात्यांना, अनेक संवादांना, अनेक संधींना संपवते.
मूढतेचा झगा म्हणजे स्वतःला लहान करणं नव्हे;
तो म्हणजे स्वतःला मोकळं करणं.
आणि जिथे मोकळेपणा असतो,
तिथेच आत्मा वसु: म्हणून कार्यरत असतो.
भगवंताचा हात
माझ्या निर्णयांमध्ये भगवंताचा हात मी जाणतो का?
“मी एकटा नाही” ही भावना मला आधार देते का?
मी कोणाच्या हाती राहणं स्वीकारलं आहे—परिस्थितीच्या की प्रभूच्या?
Comments
Post a Comment