भोजन, ‘अहं सः’ आणि भावाचे सामाजिकीकरण
भोजन करताना माणसाने काय सत् आहे आणि काय असत् आहे, याचा विचार केला पाहिजे. जेवण ही केवळ पोट भरण्याची क्रिया नाही; ती आत्मशिस्तीची आणि संस्कारांची कसोटी आहे. जेवताना अशी भावना असली पाहिजे की, मी ‘हंसः’ आहे — म्हणजेच विवेकशील, जागरूक आणि जबाबदार आहे.
जिलबी खाताना किती खायचं हे मी ठरवलं पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त जिलबी खाऊन पोट बिघडलं, तर जिलबीला नाव ठेवणं चुकीचं आहे. वांगी असो किंवा भजी—प्रमाणाच्या बाहेर खाल्ली तर त्रास होणारच. त्यात वांगी वाईट नाहीत, भजी वाईट नाहीत; तुझा संयम वाईट आहे. एवढी वांगी खायला तुला कोणी सांगितलं होतं? जेवताना स्वतःवर तुझा कंट्रोल राहत नाही, हीच तर संस्कारांची खरी गरज आहे.
‘अहं सः’ — वैयक्तिक आणि सामाजिक बोध
‘अहं सः’ — मी प्राणासमान आहे—हे आत्म्याचं वैयक्तिक वर्णन आहे; पण त्यात तितकंच सामाजिक शिक्षण दडलेलं आहे.
‘अहं सः’ चा दुसरा, अधिक व्यापक अर्थ असा आहे की दुसरा माझ्यासारखाच आहे. मला जे सुख हवं आहे, ते दुसऱ्यालाही हवं आहे. दुसऱ्याचं सुख हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही—यालाच केवलाद्वैत म्हणतात.
भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात— “आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन”
म्हणजेच, स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता, स्वतःच्या जागी दुसऱ्याला ठेवून पाहा. हीच आत्मौपम्य बुद्धी आहे—“मी त्या जागी असतो तर?”
‘अहं सः’चं सामाजिकीकरण
जर ‘अहं सः’चं सामाजिकीकरण झालं, तर घराघरांतली, कुटुंबांतली किमान ऐंशी टक्के भांडणं आपोआप कमी होतील. संपूर्ण विश्व माझ्यासारखंच आहे, आणि त्याच्या सुख-दुःखात मी पूर्णपणे समरस व्हावं—इतकी व्यापक दृष्टी सामान्य माणसात नसते. म्हणूनच भगवंताने माणसाला संसारी बनवलं आहे.
‘अहं सः’चं सामाजिकीकरण म्हणजेच पत्नी, मुलं आणि संसार. सडा माणूस हॉटेलात जातो आणि चार आण्याचं श्रीखंड खाऊन येतो. पण लग्न झाल्यावर तो एकट्याने श्रीखंड खात नाही. घरी बनवतो, सर्वांसोबत खातो; किंवा हॉटेलात गेलाच तर श्रीखंड बांधून घरी आणतो आणि बायकोसोबत खातो. हाच तो साधा, पण महत्त्वाचा अभ्यास आहे—“मला जे पाहिजे, ते दुसऱ्यालाही पाहिजे.”
नाथांसारखे महापुरुष ईश्वराशी एकरूप होऊ शकतात; पण सामान्य माणसाला तेवढी उदात्तता एका उडीमध्ये साध्य होत नाही. म्हणून तो प्रथम कुटुंबाशी एकरूप होण्याचा अभ्यास करतो. पत्नी, मुलं—ही केवळ नाती नाहीत; सामाजिकीकरणाची प्रयोगशाळा आहेत.
‘भव’ आणि ‘भाव’ यांचा फरक
भव आणि भाव यात मूलभूत फरक आहे.
भव म्हणजे—“मी होईन.”
भाव म्हणजे—“मी नाहीसा होऊन तू होशील.”
लग्न ठरेपर्यंत मुलगी म्हणते, “मी होईन”—हे भव आहे. पण तीच मुलगी जेव्हा आई होते, तेव्हा बाळाला म्हणते, “तू हो”—इथे भाव आहे.
बालपणापासून म्हातारपणापर्यंत ‘भव’ माणसाच्या मागे लागलेलाच असतो—
वित्तवान भव, कीर्तिमान भव, बलवान भव.
माणूस आधी बाप व्हायचा प्रयत्न करतो, मग आजोबा, मग पणजोबा…
या ‘भव’ ला कधी पूर्णविरामच नसतो; सर्वत्र फक्त स्वल्पविराम असतो.
हा भव म्हणजेच एक प्रकारचा रोग आहे.
पण जेव्हा “मी सुखी होईन” याऐवजी “मी पत्नीला सुखी करीन” असा विचार येतो, तेव्हा भव संपतो आणि भाव सुरू होतो. आधी माणूस म्हणतो, “मी विद्वान होईन.” पुढे तोच माणूस म्हणतो, “शास्त्रीजी! माझा मुलगा नंबर एकचा विद्वान व्हावा, यासाठी काहीही करायला तयार आहे.”
‘मी होईन’चा शेवट होऊन ‘तू होशील’ सुरू होतो—यालाच भाव म्हणतात.
महापुरुषांची ही व्याप्ती संपूर्ण विश्वापर्यंत जाते; आपण किमान कुटुंबापुरते तरी व्यापक व्हावे. या भावनेतूनच माणसाच्या अंतःकरणाचं उदात्तीकरण होतं. मी दुसऱ्याचा होईन—यात आत्म्याचं सामाजिकीकरण आहे. दुर्दैवाने आपण मात्र आजही फक्त आपलेच होऊन राहिलो आहोत.
Comments
Post a Comment