गीतेने कुणाला काय दिले ?

वांग्ङमय - रसिकांना गीतेमध्ये वांग्ङमयीन सौंदर्य दिसते, साहित्य - शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते, कर्मवीरांना गीता उत्साह देते, ज्ञानियांना ज्ञानगंगेत बुडी मारण्याची गीता संधी देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून बोलू लागते. हे सर्व तर गीतेत आहे परंतु काय एवढ्याच कारणामुळे गीतेची लोकप्रियता आहे?
     
पाप्यातला पापी मनुष्य जरी गीते जवळ आला तरी गीता - माता त्याचा तिरस्कार केव्हा उपेक्षा न करता त्याला स्वतः जवळ घेऊन प्रेमाची ऊब देते. एखाद्या दुष्ट मानवाला कुटुंबातील लोक घराबाहेर काढू शकतात, समाजातील लोक त्याला बहिष्कृत करू शकतात किंवा एखादा राजा त्याला देशातून हद्दपार करण्याचे शिक्षा फर्मावू शकतो पण आई जगदंबा त्याला जगातून बाहेर कशी काढू शकेल. गीता कोणत्याही मानवाची त्याची स्वतःवरील श्रद्धा नष्ट होऊ देत नाही.
     
निराशेच्या अंधकारात भटकणाऱ्या मानवाच्या जीवनात 'गीता आई' आशेचा प्रकाश पाडते. मनुष्याला गीता नवा उत्साह देते. निराशा ही तर नास्तिकता आहे. 'भगवान माझ्यासोबत आहे' असे मानणारा मानव कधी निराश बनत नाही. निराश मनुष्याला गीता सांगते:

'क्लैब्यं मा स्म गम: गम: पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते |
क्षुद्रं हृदयद्रौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ||
      
निराशा ही हृदयाच्या क्षुद्र दुर्बलतेचे लक्षण आहे. मानव असफल बनला की निराश होतो. परंतु असफलता ही सफलतेच्या विरुद्ध नाही, ती विलंब सुचवते. निष्फळतेमुळे निराश होऊन बसण्यापेक्षा मानवाने अधिक शक्तीने कामाला लागले पाहिजे. प्रयत्नशील मानवाच्या जीवनात येणारी निष्फळता पायऱ्यांचे रूप घेऊन सफलतेची शिडी तयार करते. निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो. गीता त्याला काट्यामध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते.
    
जो पापी नाही, तसेच जो निराश बनत नाही, अशा सामान्य माणसाच्या जीवनातही रस भरण्याचे काम गीता करते. गीता अशा मानवाला सांगते :'तस्मात् योगी भव' तू योगी बन अर्थात् कोठेतरी जोडला जा. एखादे कार्य, संस्कृती, ध्येय, राष्ट्र किंवा ईश्वर यापैकी कोणाशी तरी जोडले गेल्याशिवाय जीवनाचा विकास असंभव आहे. वृक्ष जमिनीशी जोडलेला असतो म्हणूनच त्याचे जीवन सफल होते.
     
 विभिन्न वर्णाच्या लोकांनाही गीता वेगवेगळ्या उपदेश देते. ब्राह्मण ही संस्कृतीची प्रेरक शक्ती. म्हणून गीता तिला शम,दम, तप, शौच इत्यादी गुण वाढवायला व त्याचे संवर्धन करायला सांगते. क्षत्रिय संस्कृतीचे रक्षक. म्हणून घेता त्यांना शौर्य, तेज, धैर्य, दक्षता वगैरे गुणांचे महत्त्व समजावते. वैश्य हे संस्कृतीचे पोषक. म्हणून घेता त्यांना कृषी, गोरक्ष व वाणिज्य यांच्यात समरस होण्याचा आदेश देते. शूद्र हा संस्कृतीचा सेवक. समाजाच्या भौतिक गरजा पुऱ्या करणारा. या वर्गाने मनात आणले तर तो शोषक बनवू शकतो. म्हणून गीता या वर्गाला सेवेच्या भावनेने काम करण्याचा आदेश देते.
    
तसेच जीवनाच्या विभिन्न अवस्था जो उत्तम प्रकारे जगला तो मनुष्य अंतिम अवस्था प्रमाण म्हणजे मृत्यूला घाबरत नाही, असे सांगून गीताकाराने विभिन्न आश्रमाच्या लोकांनाही मार्गदर्शन केलेले आहे.
    
जीवनात येणाऱ्या शैशव, यौवन व वार्धक्य या तीन अवस्था देखील फारच सूचक व मार्गदर्शक आहेत. प्रत्येक अवस्था बदलणारी आहे. परंतु एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करताना मागील अवस्थेतील सुंदरता व उपयोगिता सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. शैशवातील विद्याप्राप्तीसाठी असलेली जिज्ञासा व ओढ जर जीवनभर सोबत राहिली तर समग्र जीवनाचा काळ सुवर्णकाळ बनून राहतो. निश्चिंतता व निष्पापत्ता, ही देखील बालपणाकडून मानवाला मिळणारी वरदान आहेत.
     
यौवन माणसाला थोडा वेळ अव्यवहारी बनवून सहसाचा महिमा समजावते. सतत संरक्षण शोधण्याचे मनवृत्ती हा मानव जीवनाला दुर्गंधी आणणारा बिघाड आहे. संस्कृती - रक्षण किंवा प्रभू कार्यासाठी हिमतीने उडी घेण्याची मनोवृत्ती दाखवते.
    
वार्धक्यात मानव - मनाचे वळण बदलून त्याला अधिक ईश्वराभिमुख बनवते. स्वतः जवळ असलेल्या अनुभवाच्या भांडवलाच्या आधाराने खरा वृद्ध समाजात भाव व भक्ती यांचे संवर्धन करायला बाहेर पडतो.
     
मी बालक असेन पण बालिश नाही, तरुण असेन पण उत्शृंखल नाही, वृद्ध होईन पण निराश नाही. ही  त्रिसूत्री मानवी - जीवनाच्या तीनही अवस्थांचा सुंदर समन्वय समजावते. जीवनाच्या तीनही आश्रमांना सुंदर बनवून माणूस मृत्यूचे स्वागत करायला तयार राहील इतके सुयोग्य मार्गदर्शन गीता करते.
    
संन्याशाला गीता सांगते की, संन्यास हा केवळ बाहेरचा देखावा नाही, आंतरिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. संन्यास घ्यायचा नसतो तर तशी मनोवृत्ती बनवायची असते. संन्यास कपड्यात नाही, वृत्तीत सामावलेला आहे. भगवा रंग वस्राला नाही, मनाला चढवला पाहिजे. त्याग, बलिदान किंवा समर्पणाची भावना मनुष्याला खरा संन्याशी बनवते. काम्य कर्मांनां प्रभू चरणावर अर्पण करणे हाच खरा संन्यास!
      
स्रीसाठी गीताकरांचा विशिष्ट संदेश आहे. - कीर्ती, श्रीवाक् च नारीण स्मृतीर्मेधा धृति: क्षमा | स्त्रीने कीर्तीचे पालन केले पाहिजे. स्रीने 'श्री' म्हणजे लक्ष्मी प्राप्त केली पाहिजे. घराघरात असलेले गृहलक्ष्मी वनलक्ष्मी शोभली पाहिजे. लज्जा हा स्री चा खरा दागिना आहे आणि मर्यादेतच तिचे खरे सौंदर्य साठलेले आहे. स्रीची वाणी प्रेमळ, पावन व प्रेरक असली पाहिजे. स्री महान कार्य करायला जन्मलेली आहे याची तिला सतत स्मृती असली पाहिजे.
    
विद्यार्थ्याला गीता सांगते- 'तव्दिध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया|' तुला जर विद्या प्राप्त करायची असेल तर तुझ्याजवळ प्रणीपात म्हणजे नम्रता, परिप्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि सेवा या तीन गोष्टी असल्या पाहिजेत नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर टिकत नाही आणि टिकले तर शोभत नाही. एकच पुरुष द्रोणांचे दोन शिष्य दुर्योधन व अर्जुन. त्यांच्यातील तफावत ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे समजावते. 'विद्या विनयेन शोभते|' त्याचप्रमाणे जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा नसेल तर गुरु कितीही महान असला तरी तो त्याला ज्ञान देऊ शकत नाही. शेवटी मिळालेले अज्ञानही गुरु सेवेतच वापरले तरच त्याला सुगंध येतो. शिवाय जो श्रद्धावान व संयमी असतो त्याला ज्ञान प्राप्त होते.
    
ज्ञान देणारा गुरु किंवा शिक्षक यांच्या योग्यतेचा उल्लेख करताना गीता सांगते: -
 उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:'|   
     
ज्ञानाचा उपदेश करणारा मनुष्य ज्ञानी तसाच तत्त्वदर्शी असला पाहिजे. ज्याच्या स्वतः जवळच ज्ञान नसते तो ते दुसऱ्याला कसे देऊ शकणार? शिवाय गुरुतत्त्वदर्शी देखील असला पाहिजे. त्याच्या जीवनात तपश्चर्याचे पाठबळ, ज्ञानाची खोली आणि अनुभवाचे सार असले पाहिजे. सारांश, शिक्षक किंवा गुरु विचाराने विद्वान व आचाराने सज्जन असला पाहिजे.
    
गीताकारांचा विद्वानांना संदेश आहे की, त्यांनी त्यांच्या बुद्धीचा उपयोग सामान्यज्ञांची भावना नष्ट करण्यात किंवा श्रद्धा उडवून लावण्यात करू नये. सामान्य माणूस जी कर्मे असक्तीने करीत असेल तीच कर्मे त्याने अनासक्तीने केली पाहिजेत. सामान्य माणसाला त्याच्यासारखाच बनून, त्याच्या सामान्य कर्मातून हळूहळू वर घेऊन जाणे हे विद्वान माणसाचे कर्तव्य आहे.
 'न बुद्धीभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम| जोषयेत्सर्वकर्माणि विव्दान्युक्त: समचरन्||
     
नेता, मग तो सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय, कोणत्याही क्षेत्रातला असो, त्याने स्वतःच्या जिवंत आचारणाने समाजाला प्रेरक मार्गदर्शन दिले पाहिजे, असा गीतेचा आग्रह आहे.
'यद्यदाचरति श्रैष्ठस्तत्तदेवेतरो जन:|
 स यत्प्रमाणं कुरुते लोकसत्तदनुवर्ततेन||'
     
मोठ्या माणसावर जबाबदारी असते. त्याने समाजाला योग्य मार्गदर्शन करायचे असते. राजकीय नेत्यासाठी तर गीताकाराने जनकाचे उदाहरण देऊन तत्त्वचिंतक- राजनीतिज्ञाचा आदर्श उभा केला आहे.
     
कार्यकर्त्याला गीता सांगते, तू तुझ्या कर्माचा कर्मयोग बनव. 'योग: कर्मसु कौशलम् |'कर्मात कुशलता याचे नावच कर्मयोग. कुशलतेने काम करायचे म्हणजे हृदयाच्या सहयोगाने काम करणे. कोणतेही काम मन लावून करता आले तरच ते चांगले होते; मन चोरून नाही.
    
साधकाला गीताकार अतिशय उपयोगी मार्गदर्शन करतात.
 बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते| वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदूर्लभ:||
     
येथे अनेक जन्मानंतर भगवान भेटेल असे सांगून गीता मानवाला निराश करत नाही, तर साधनेचे गांभीर्य व धैर्याचे महत्त्व समजावते. कोणतीही वस्तू विना मेहनत किंवा झटपट मिळत नाही. तर सत् इच्छा व सिद्धी यांच्यामध्ये असलेले अंतर पार करण्यासाठी करावा लागणारा प्रयत्न, म्हणजेच साधना. परिश्रमाशिवाय होणाऱ्या प्राप्तीत आनंद नाही, तसेच साधने शिवाय मिळालेल्या सिद्धीत गोडवा नाही. शिवाय, साधना देखील जाणीवपूर्वक असली पाहिजे. साधनेमध्ये निश्चित दिशा, नक्की गती व क्षणोक्षणी जागृती अपेक्षित आहे. उपरोक्त श्लोकात गीता साधकाचे या गोष्टीकडे ध्यान खेचित आहे.
     
ज्ञानियांना गीता सांगते, तुम्ही केवळ वाद-विवाद न करता संवाद करा गीता देखील कृष्ण व अर्जुन यांच्यामधील संवाद आहे. विवादात स्वतःच्या मताबद्दल प्रत्येकाचा आग्रह असतो. म्हणून तेथे द्वेष, भांडणे निर्माण होतात. संवादात समोरच्या माणसाची मते, विचार समजण्याची किंवा स्वीकारण्याची सहिष्णूता असते म्हणून त्याच्यातून संगीत निर्माण होते.
    
कर्मयोग्याला गीतेचा संदेश आहे - कर्म करणे हाच तुझा अधिकार आहे. तू फळाची चिंता केलीस तर अर्धे मन कर्माकडे व अर्धे मन फळाकडे राहील. अशा अर्ध्या मनाने केलेल्या कर्माचे फळ कसे चांगले येणार? फळाचा विचार न करता संपूर्ण मन कर्मामध्ये लावून माणूस काम करेल तर फळ चांगलेच येईल, हे निसं:शय आहे. शिवाय मला सक्ती रहीत केलेले कर्म माणसाला बाधकही होत नाही.
     
भक्ताला गीता सांगते : न मे भक्त: प्रणश्यति| भक्ताचा कधी नाश होत नाही. त्याची काळजी भगवंत स्वतः घेतात. भगवंताने भक्ताला आश्वासन दिलेले आहे- माझ्या भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. त्याला न मिळालेली वस्तू मी प्राप्त करून देतो आणि मिळालेल्या वस्तूचे रक्षण करतो. पतीला जीवन समर्पित केलेल्या पत्नीची काळजी जर पती घेतो तर भगवंताला जीवन समर्पित करणाऱ्या भक्ताची भगवान काळजी घेतात त्यात नवलाई कसली?
    
गीता मानवाला सुखी होण्याची मानसशास्त्रीय जीवन कला शिकविते. माणसाचे मन भाववाही, प्रतिकारक्षम व विकसनशील बनले पाहिजे. सुख प्राप्त करण्याची, भोगण्याची तसेच पचवण्याची मनात शक्ती असली पाहिजे. मनाची एकाग्रता शक्ती वाढविली पाहिजे.
    
क्षर आणि अक्षर पुरुषाची शुष्क चर्चा करणाऱ्या तत्त्ववेत्यांना गीताकार उत्तम पुरुषाची कल्पना देतात. तत्त्वज्ञानात पुरुषोत्तम ईश्वर मिळवताच त्यातील शुष्कता निघून जाते. भारतीय तत्त्वचिंतक तत्त्वज्ञानाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यावरही शुष्क बनत नाहीत. कारण त्यांचे या उत्तम पुरुषावर असलेली श्रद्धा. ज्ञान प्राप्तीनंतरही मानवाचे ह्रदय भावाद्र राहावे हीच तत्त्वज्ञानाची खरी फलश्रुती असू शकते.
    
अशा प्रकारे विविध प्रकारच्या मानवांना, त्यांना अनुरूप असा मार्गदर्शक संदेश देणारी गीता शेवटी तर मानवाला खरा मानव बनायला सांगते.
    
शेवटी एवढेच सांगायचे आहे की, जेव्हा आपले जीवनच गीतेवरील जिवंत भाष्य बनेल तेव्हाच गीता जयंती साजरी केली म्हणता येईल. गीता मातेचा पवित्र संदेश आपल्या जीवनात झेलून आपणही खऱ्या अर्थाने धनुर्धर पार्थ बनण्याचा संकल्प करू.
    
अर्जुन आपला आदर्श असावा व कृष्णा आपल्याला सहाय्यक असावेत. या दोन महापुरुषांना नजरेसमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची योग्य घडण करायला सुरुवात करणे हीच गीतेची फलश्रुती आहे

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन