गुरु अनेक प्रकारचे आहेत.

गुरुचे अनेक प्रकार 
गुरुचे अनेक प्रकार आहेत. जसे मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरू, दोष विसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरू, वात्सल्य गुरु, कुर्म गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, क्रौंच गुरु वगैरे. या प्रत्येक गुरुची वेगवेगळे विशेषता आहे.
  
 मार्गदर्शक गुरु शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो‌. गुरु शिष्याचा जीव एकमेकात संपूर्णपणे एकरूप झालेला असेल तरच खरे मार्गदर्शन शक्य बनते. शिष्य स्वतःला अनुकूल असते तेवढीच गोष्ट स्वीकारतो व प्रतिकूल गोष्ट स्वीकारू शकत नसेल तर गुरु मार्गदर्शक बनवू शकत नाही. स्वतःचे नावडते देखील मानण्याची तयारी असेल त्यालाच हा मार्गदर्शक गुरु मिळण्याचा संभव आहे. पृच्छक गुरुची देखील आगळी भूमिका आहे. सामान्य रित्या शिष्य विचारतो आणि नंतर गुरु उत्तर देतो. विचारल्याशिवाय कोणाला काही सांगू नये, अशी स्मृतीची आज्ञा आहे, परंतु येथे तर शिष्याबरोबरच्या घनिष्ठ व आत्मीय सबंधामुळे पृच्छक गुरु स्वतः शिष्याला प्रश्न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतो.
     
दोष विसर्जक गुरु जवळ शिष्य आत्मीय भावाने विना संकोच स्वतःचे दोष सांगतो. त्याची खात्री असते की, गुरूला दोष सांगून देखील मी त्याच्या नजरेतून उतरणार नाही. तसेच गुरु माझ्या दोषांचा गैरफायदा ही उठवणार नाही. ज्याच्या केवळ सानिध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो तो चंदन गुरु‌. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसऱ्यांना सुगंध देते. त्याप्रमाणे असा गुरु प्रभू कार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सौरभ पसरवितो. असा गुरुवाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो. सतकार्यासाठी संकटे सहन करून संस्कृतीचा श्वास पसरविण्याचे शिक्षण शिष्याला गुरुच्या जीवनातूनच मिळते.
    
विचार गुरु मिळणे फारच दुष्कर आहे. शिष्याच्या अंधकारमय जीवनात तो प्रकाश प्रदीप प्रगटवतो. अशा गुरुचा स्वतःच्या बुद्धीवर तसाच शिष्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच तो दुराग्रही न बनता शिष्याला समजावून, त्याच्या बुद्धीत स्वतःचे विचार उतरवून त्याला सन्मार्गावर घेऊन जातो. त्याच्यासाठी लागणारे अपेक्षित धैर्य त्याच्याजवळ विपुल प्रमाणात असते. तो समजावताना थकत नाही किंवा कंटाळत नाही. अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी त्याच्या बुद्धीत ज्ञान प्रकाश पाडण्यासाठी गीतेचे आठरा अध्याय सांगायला भगवान श्रीकृष्ण कंटाळले नाहीत आणि एवढे सांगितल्यानंतरही अर्जुनाच्या विवेक बुद्धीवरील विश्वास ते अनाग्रही राहू शकले आहेत, अशा गुरूच्या सानिध्यात शिष्याची बुद्धीनिष्ठा फुलते.
    
अनुग्रह गुरु अभिषेक कृपाळू असतो. अपंग बालकाला आई जशी कडेवर घेऊन पर्वतावर चढते तसा अशा अपंग बालकासारख्या, मंद बुद्धीच्या शिष्यावर अनुग्रह करून हा गुरू त्याला पुढे घेऊन जातो. गुरु शिवाय ज्ञान मिळत नाही याचा अर्थ असा की, गुरु आपल्याला आपला विकास व अधिकार पाहून ज्ञान देतो. योग्यते शिवाय मिळालेले विद्या पचत नाही; ती फुटून निघते. न पचलेले अन्न जसे दुर्गंधी निर्माण करते तसे न पचलेले ज्ञान देखील जीवनाला दुर्गंधी बनवते.
      
स्पर्श गुरू तर परिसाप्रमाणे स्पर्श मात्रे करून शिष्याच्या जीवनात महान परिवर्तन घडवून आणतो. गुरुचा स्पर्श होताच गुरुची सर्व शक्ती शिष्यामध्ये संक्रमित होते. या प्रयोगाला शक्तिपात प्रयोग म्हणण्यात येते. वात्सल्य गुरुच्या सहवासाने त्याच्यात सर्व शक्तीचा संचार होत नसला तरी शिष्याला अशा गुरुची मदत व उबारा मिळतो, जो जीवन विकासात अतिशय उपयोगी आहे. कुर्म गुरूची कृपादृष्टी शिष्याच्या विकासाला कारणीभूत बनते. कासव जसे प्रेमळ नजरेने स्वतःच्या बालकाचे संवर्धन करते तशी कुर्म गुरूची मधुर दृष्टी शिष्यामध्ये प्रेम, शक्ती व तेजस्विता वाढविते. चंद्र गुरु दूर राहूनही शिष्याच्या जीवनात शितलता व शांतीचे साम्राज्य स्थापन करतो. चंद्र जसा दूर राहूनही चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो तसा चंद्र गुरु स्वतःच्या प्रभावाने दूर असलेल्या शिष्याच्या जीवनातही परिवर्तन निर्माण करतो.
    
दर्पण गुरु शिष्याला आत्मनिरीक्षण करायला लावतो. दर्पणात पाहणे म्हणजे स्वतःला स्वतःच ओळखण्याचा प्रयत्न करणे. दर्पणात पडणारे आपले प्रतिबिंब हे आपला खरा मित्र आहे, हे जर आपल्यावर नाराज असेल तर आपल्या जीवनातील शांती व स्वास्थ्य बिघडून जाईल. क्रौंच गुरु स्मरण मात्रे करून शिष्याचे कल्याण साधू शकतो. क्रौंच पक्षाची मादी सहा सहा महिने दूर राहूनही स्वतःच्या अंड्याचे पोषण करते‌. तसा हा गुरु देखील दूर असलेल्या परोक्ष शिष्याचे स्मरण करून त्याच्या विकासात सहाय्यभूत बनू शकतो‌. शिष्य गुरूचे स्मरण करतो हा स्वाभाविक्रम घालला जातो. पण गुरु स्वतः शिष्याच्या स्मरणात स्वतःला विसरून जातो तो शिष्य किती ज्ञाननिष्ट असला पाहिजे! भगवान भक्ताचे चिंतन करतो तसे माधुर्य त्याच्यात आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन